मुंबई : बनावट तिकीट घेऊन विमानतळामध्ये प्रवेश करण्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी रात्री उघडकीस आला. याप्रकरणी केंद्रीय सुरक्षा बलाच्या (सीआयएसएफ) अधिकाऱ्यांनी एका जोडप्याला तीन वर्षांच्या लहान मुलासह ताब्यात घेत सहार पोलिसांकडे सोपवले. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताहेर अबीदिन बाजारवाला (४४) आणि खजिदा बाजारवाला (३८) हे दोघे त्यांच्या तीन वर्षांच्या मुलासोबत निर्गमन गेट क्रमांक पाचच्या परिसरात रेंगाळत होते. तेव्हा सीआयएसएफ अधिकारी अरविंद कुमार यांनी त्यांना तिकिटाबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांनी कुवेत एअरलाइन्सचे १७ एप्रिलचे तिकीट दाखविले. विमानतळातून बाहेर जाण्याचे कारण विचारले असता त्यांच्याकडे ठोस उत्तर नव्हते. त्यामुळे अरविंद कुमार यांनी तिकिटाच्या सत्यतेबाबत कुवेत एअरलाइन्सकडे विचारणा केली. तेव्हा त्यांनी संबंधित तिकीट कुवेत रिलायन्सकडून जारी केलेले नाही, असा लेखी अहवाल दिला. अधिक चौकशीत ताहेर याची आई, मुलगा आणि मुलगी हे १७ एप्रिलला केयु -३०४ या विमानाने कुवेतला जाणार असल्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी त्यांनी बनावट तिकिटाच्या आधारे विमानतळामध्ये प्रवेश केल्याचे दिसले.
दरम्यान, राजस्थानमधील ट्रॅव्हल्स एजंट सैफ टूर्स ट्रॅव्हल्सचे मालक हुसेन भाई दाहोदवाला यांच्याकडून तिकीट प्राप्त केल्याचेही स्पष्ट केले. त्यानुसार या दोघांनाही सीआयएसएफ दलाचे उपनिरीक्षक अभिषेक यादव सिंग (३२) यांनी सहार पोलिसांच्या ताब्यात दिले.
...म्हणून दोघे अडकले!ई तिकिटाची सुविधा अस्तित्वात आल्यापासून मोबाइल फोनमधील विमान तिकीट दाखवले तरी विमानतळामध्ये प्रवेश मिळतो. मात्र काही कारणाने जर विमान प्रवास करायचा नसेल तर त्या प्रवाशांच्या नावाची संबंधित एअरलाइन्स कर्मचाऱ्याकडून निर्गमन गेट क्रमांक ३ व ६ येथील सीआयएसएफच्या रजिस्टरमध्ये नोंद घेतली जाते व त्याच प्रवाशांना बाहेर जाण्याची परवानगी मिळते. आरोपींनी अशी कोणतीही नोंद केली नव्हती ज्यामुळे ते अखेर अडकले.