विमानतळावरील धावपट्टी रिकार्पेटिंगचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 07:24 PM2020-04-08T19:24:48+5:302020-04-08T19:25:26+5:30
कोरोना प्रादुर्भावामुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक बंद आहे. त्याचा मोठा फटका बसत आहे.
मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक बंद आहे. त्याचा मोठा फटका बसत आहे. मात्र मुंबईविमानतळ व्यवस्थापनाला मात्र त्याचा लाभ झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी नुतनीकरण व दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करणे व्यवस्थापनाला शक्य झाले आहे.
विमानतळावरील मुख्य धावपट्टी 09/27 चे रिकार्पेटिंग करण्याचे काम वेळेत पूर्ण झाल्याने व्यवस्थापनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. केंद्र सरकार च्या निर्देेशानुसार भारतातील देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक 14 एप्रिलच्या रात्री बारा वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे त्यानंतर सुरु होणारी विमाने विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवर उतरु शकतील व तिथून उड्डाण करु शकतील.
मुंबई विमानतळावर दोन धावपट्टी आहेत. दोन्ही धावपट्ट्या एकमेकांना छेद देणाऱ्या असल्याने एका वेळी एकाच धावपट्टीचा वापर केला जावू शकतो. एका धावपट्टीचा वापर होणाऱ्या जगातील सर्वात व्यस्त विमानतळामध्ये मुंबई विमानतळाचा समावेश होतो. चौवीस तासात सरासरी 980 विमानांचे व्यवस्थापन केले जाते. धावपट्टीची दुरुस्ती करण्यासाठी 835 कर्मचारी कार्यरत होते. कोविड 19 मुळे उद्बवलेल्या परिस्थितीत या कर्मचाऱ्यांमध्ये कपात करण्यात आली होती. तसेच सोशल डिस्टन्सिंग देखील पाळण्यात आली.
धावपट्टीच्या रिकार्पेटिंग कामामध्ये 3,448 मीटर म्हणजे सुमारे 11 हजार 309 फूट भागाची दुरुस्ती करण्यात आली. या कामासाठी हॉट मिक्स ओव्हरलेईंग पध्दतीचा वापर करण्यात आला. यावेळी सर्व एरॉनॉटिकल ग्राऊंड लाईट सिस्टिम काढण्यात आली होती. विमान वाहतूक सुरळीत व सुरक्षित सुरु राहील याची सर्व काळजी घेऊन हे काम करण्यात आल्याची माहिती विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.