Join us  

विमानतळबाधितांची पुनर्वसन प्रक्रिया

By admin | Published: May 26, 2014 4:58 AM

आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळ प्रकल्पामुळे विस्थापीत होणार्‍या ग्रामस्थांचा विरोध आता मावळला आहे.

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळ प्रकल्पामुळे विस्थापीत होणार्‍या ग्रामस्थांचा विरोध आता मावळला आहे. त्यामुळे बाधित होणार्‍या गावांच्या पुनर्वसनासाठी सिडकोने आता कार्यवाही सुरू केली आहे. सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालिका व्ही.राधा यांच्या उपस्थितीत शनिवारी या प्रक्रियेचा प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात आला. विमानतळामुळे बाधीत होणार्‍या चार गावांच्या पुनर्वसनासाठी उभारण्यात येणार्‍या पुष्पकनगरच्या प्रस्तावित जागेवर व्ही.राधा यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुनर्वसन फलक लावून या प्रक्रियेचा प्रत्यक्षपणे शुभारंभ केला. नवी मुंबई आंतरराष्टÑीय विमानतळ प्रकल्पामध्ये पनवेल तालुक्यातील १० गावांचे पुनर्वसन करण्याचे तसेच त्यांना २२.५ टक्के भूखंड देण्याचे पॅकेज सिडकोने निश्चित केले आहे. विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणार्‍या १० गावांचे पुनर्वसन सिडको तीन ठिकाणी करणार आहे. त्यापैकी उलवा, गणेशपुरी, कोंबडभुजे आणि वहाळ या चार गावातील विस्थापितांचे पुनर्वसनाचे काम सिडकोने हाती घेतले आहे. या ठिकाणी सिडकोला पुनर्वसनासाठी २० हेक्टर जागा कमी पडत असून गावकर्‍यांकडून सदर जागा संपादीत करण्याचे काम सिडकोने हाती घेतले आहे. तर चिंचपाडा पारगाव कोल्ही आणि वाघिवली या चार गावातील विस्थापितांचे पुनर्वसन करंजाडे येथे करण्यात येणार आहे. कोपर आणि वरचे ओवळे या दोन गावांचे पुनर्वसन नॅशनल हायवे- ४बी लगत सिडकोच्या ताब्यात असलेल्या जागेत केले जाणार आहे. शनिवारी वहाळ येथे नवी मुंंबई आंतररार्ष्ट्रीय विमानतळ पुनर्वसन व पुन:स्थापन क्षेत्राच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांच्यासह सिडकोचे मुख्य अभियंता केशव वरखेडकर, अधिकारी अरुण देशमुख, अरविंद जाधव, प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचे नेते रवि पाटील, वहाळचे सरपंच आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.