विमानतळ सुरक्षेची ‘आकृती’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 11:56 PM2019-03-07T23:56:44+5:302019-03-07T23:57:05+5:30
मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील आकृती बागवे या सध्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जेट एअरवेजच्या स्टेशन मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.
- खलील गिरकर
मुंबई : २५ वर्षांपूर्वी हवाई सुंदरी बनण्याचे स्वप्न पाहता पाहता ग्राउंड स्टाफ म्हणून कामाला प्रारंभ करणाऱ्या मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील आकृती बागवे या सध्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जेट एअरवेजच्या स्टेशन मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. तब्बल १२०० कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दररोज १४१ फ्लाईटद्वारे सुमारे १८ ते २२ हजार प्रवाशांना सुरक्षित व सुखदायक प्रवास करण्याची जबाबदारी बागवे यांच्यावर आहे. आकृती यांनी ही जबाबदारी यशस्वीरीत्या पेलून महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत हा संदेश दिला आहे.
गोव्यात माहेर असलेल्या व जन्माने मुंबईकर असलेल्या आकृती यांचे सासर सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यात आहे. वडील व मामा एअर इंडियामध्ये कामाला असल्याने घरी लहानपणापासून हवाई क्षेत्राबाबत चर्चा होत होती. आकृती यांचे हवाई सुंदरी बनण्याचे स्वप्न होते. मात्र हवाई सुंदरी बनण्याऐवजी आकृती या जेट एअरवेजमध्ये ग्राउंड स्टाफ म्हणून कामाला लागल्या व आपल्या कामामुळे एक एक पायरी वर चढत त्या आता मुंबईसारख्या महत्त्वाच्या विमानतळाच्या स्टेशन मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.
मुंबईमधून दररोज जेटच्या सर्वांत जास्त विमानांची वाहतूक होते. त्याखालोखाल दिल्लीमधून जेटच्या १२० विमानांची वाहतूक होते. त्यामुळे इतर कोणत्याही विमानतळावर स्टेशन मॅनेजर म्हणून काम करणे व मुंबईसारख्या सर्वांत जास्त वाहतूक असलेल्या विमानतळावरील विमानांचे व्यवस्थापन पाहणे यामध्ये मोठा फरक आहे. स्टेशन मॅनेजर म्हणून काम करताना आकृती यांना एकाच वेळी अनेक जबाबदाºया, व्यवधाने सांभाळावी लागतात. व्हीव्हीआयपी प्रवास नेहमी सुरू असतो. सीआयएसएफ, कस्टम, इमिग्रेशन यासारख्या विविध यंत्रणांसोबत समन्वय ठेवावा लागतो. त्याचवेळी प्रवाशांच्या समस्या सोडवाव्या लागतात. कोणताही प्रवासी नाराज होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. जेट एअरवेजच्या विमानाने प्रवास करणाºया प्रवाशाने मुंबई विमानतळावर प्रवेश केल्यापासून विमानाचे उड्डाण होईपर्यंत त्याची पूर्ण जबाबदारी आकृती यांच्यावर असते.
आकृती या व्यावसायिक जबाबदाºया लीलया पेलत असताना आपल्या खासगी आयुष्यातदेखील मुलगी, पत्नी, सून, आई, मैत्रीण अशा भूमिका यशस्वीपणे बजावत आहेत़
(-आकृती बागवे, स्टेशन मॅनेजर, जेट एअरवेज, मुंबई विमानतळ)