विमानतळ कर्मचारीही सोने तस्करीत सामील; पावणे तीन कोटींचे सोने जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 05:41 AM2024-11-11T05:41:40+5:302024-11-11T05:42:04+5:30
डीआरआयची कारवाई, २. ६७ कोटींचे सोने जप्त.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विमानतळावरील ग्राहक सेवा कर्मचारी आणि सेलेबी एनएएस एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि.च्या ग्राउंड हँडलिंग स्टाफ सदस्याच्या मदतीने सुरू असलेल्या सोन्याच्या तस्करीचा महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) पर्दाफाश करून पावणे तीन कोटींचे सोने जप्त केले. डीआरआयने या कारवाईत विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.
डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावरील सेलेबी एनएएस एअरपोर्ट सर्व्हिसेसचा कर्मचारी आणि ग्राहक सेवा प्रतिनिधीचा सोने तस्करीत सहभाग असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्याआधारे डीआरआयच्या पथकाने कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले होते.
३,३५० ग्रॅमची सोन्याची पेस्ट
डीआरआयच्या पथकाने एका महिला प्रतिनिधीला विमानतळावरील गेटजवळ अडवले. झडतीत तिच्याजवळ सोन्याची दोन पाकिटे सापडली. त्यात ३,३५० ग्रॅमची सोन्याची पेस्ट होती. महिला कर्मचाऱ्याच्या चौकशीतून डीआरआयने ग्राउंड स्टाफ कर्मचाऱ्यालाही ताब्यात घेतले. त्यानेच हे सोने फ्लाइट (इव्हाय २००) मधील वेस्ट कार्टमधून काढून महिलेच्या ताब्यात दिले.
...त्याआधीच ती ताब्यात
सोने बाहेर नेण्याची जबाबदारी महिला कर्मचाऱ्यावर होती. पण, त्याआधीच ती पकडली गेली. डीआरआयने सुमारे दोन कोटी ६७ लाखांचे सोने जप्त केले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.