विमानतळ कर्मचाऱ्यांना लोकलमध्ये प्रवेश नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:05 AM2021-04-26T04:05:22+5:302021-04-26T04:05:22+5:30
लांबून येणाऱ्यांचे हाल; दररोज कार्यालय गाठण्यासाठी कसरत लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अत्यावश्यक सेवांच्या यादीत येत असूनही मुंबई विमानतळाच्या ...
लांबून येणाऱ्यांचे हाल; दररोज कार्यालय गाठण्यासाठी कसरत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अत्यावश्यक सेवांच्या यादीत येत असूनही मुंबई विमानतळाच्या कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवासास मनाई करण्यात येत आहे. त्यामुळे लांबून येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
एअर इंडियाचे कर्मचारी शासकीय सेवेत मोडत असल्याने त्यांना लोकल प्रवासाची मुभा आहे. परंतु, खासगी विमान कंपन्यांचे कर्मचारी, मुंबई विमानतळाच्या सेवेत असलेले ग्राऊंड स्टाफ, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक, कार्गो सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवास करू दिला जात नाही. यातील बहुतांश कर्मचारी हे वसई, विरार, पालघर, टिटवाळा, कर्जत, पनवेल येथे राहणारे आहेत. त्यामुळे दररोज खासगी वाहनांनी ये-जा करणे त्यांना परवडण्यासारखे नाही. काहीजण कंत्राटी तत्वावर असल्याने दररोज कामावर हजर न झाल्यास नोकरी जाण्याची भीती आहे. त्यामुळे त्यांना ७०० ते ८०० रुपये मोजून खासगी वाहनांनी कार्यालय गाठावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
विमानतळ कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेत येतात. विमानतळ क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी केंद्र शासनाने त्यांना विशेष पास उपलब्ध करून दिले आहेत. विमानात इंधन भरणे, फ्लाईटची सफाई, सामानाची ने-आण अशी कामे ग्राउंड स्टाफ पार पडतात. ते वेळेत कामावर हजर न झाल्यास विमान उड्डाणास विलंब होतो. आता लोकल प्रवास बंद असल्याने अनेक कर्मचारी कामावर येत नाहीत. खासगी वाहनांनी येणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही कामावर येणे बंद केल्यास मुंबई विमानतळावरून एकही विमान उडू शकणार नाही. त्यामुळे विमानतळ कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे.
* रेल्वेचे म्हणणे काय?
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू केलेल्या कठोर निर्बंधांच्या कालावधीत लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी असलेल्या क्षेत्रांची यादी २१ एप्रिल रोजी राज्य शासनाने जाहीर केली. त्यात सरकारी कर्मचारी, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि मेडिकल इमर्जन्सी असलेल्या व्यक्तींना काही अटींनुसार प्रवासास परवानगी देण्याचा उल्लेख आहे. या यादीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रवाशाला लोकल प्रवासास परवानगी देण्यात येत नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
.....................................