Join us

विमानतळ, रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून चढाओढ; भाजप-शिवसेनेत रंगला कलगीतुरा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 2:13 AM

विधानसभेत कुरघोडीचे प्रयत्न, भाजपचे आशिष शेलार यांनी त्याची तात्काळ दखल घेत, संभाजी महाराजांवर तुमचे जितके प्रेम आहे, तितकेच प्रेम आमचे आहे.

मुंबई : औरंगाबाद येथील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा आणि मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकास नाना शंकरशेठ यांचे नाव देण्याचा ठराव विधानसभेने शुक्रवारी एकमताने मंजूर तर केला पण या निमित्ताने भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीतील कलगीतुरा रंगला. या निमित्ताने श्रेय-अपश्रेयाचेही राजकारण झाले.

औरंगाबादच्या विमानतळाबाबतचा ठराव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर नाना शंकरशेठ यांच्याबाबतचा ठराव हा परिवहन मंत्री अनिल परब यांनी मांडला व तो एकमताने मंजूरदेखील झाला. त्यावेळी भाजपच्या सदस्यांनी अर्थसंकल्पांवरील वित्तमंत्री अजित पवार यांच्या उत्तराचा निषेध करीत सभात्याग केलेला होता पण भाजपचे पाचसहा सदस्य सभागृहात परत आलेले होते. हाच धागा पकडून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपच्या सदस्यांना छत्रपती संभाजी महाराजांबद्दल प्रेम नाही काय, ते सभागृहात का नाहीत, असा सवाल करीत डिवचले. अजित पवार यांनीही त्यांना साथ दिली.

भाजपचे आशिष शेलार यांनी त्याची तात्काळ दखल घेत, संभाजी महाराजांवर तुमचे जितके प्रेम आहे, तितकेच प्रेम आमचे आहे. बेंडकुळ्या दाखवून असा टोला लगावत तुम्ही जरी हा प्रस्ताव मंजूर केलेला असला तरी तो शेवटी हा प्रस्ताव केंद्राकडे जाणार आहे. आणि केंद्रात आम्हीच असून तो मंजूरही आम्हीच करणार आहोत. मात्र तुमचे प्रेम बेगडी असून औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचा निर्णय तुम्ही घेतला होतात. मात्र आज पुन्हा शहराचे नामांतर करण्याऐवजी केवळ विमानतळाचे करता आहात. त्यामुळे तुमचे प्रेम बेगडी असल्याची टीका केली.‘पाच वर्षांपूर्वीच ठराव पाठविला’आम्ही असले छोटे राजकारण करत नाही आणि करणार नसल्याचे सांगत गेली २५ वर्षे पालिकेत सत्ता असूनही नाना शंकरेशेठ यांचे नाव देण्याचे काम आतापर्यंत का केले नाही, असा सवाल शेलार यांनी केला. आमच्या महापालिकेने पाच वर्षांपूर्वीच तसा ठराव करून राज्य सरकारकडे पाठविला होता पण सरकारने काहीही केले नाही, असा हल्लाबोल शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी केला. त्यावर भाजपच्या योगेश सागर यांनी धाराशीव आणि संभाजीनगर नामांतराचा प्रस्ताव लगेच सभागृहात मांडा व मंजूर करा, असे आव्हान शिवसेनेला दिले.

 

टॅग्स :शिवसेनाभाजपा