मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात सर्वत्र निदर्शने करण्यात येत आहेत. यातच आता एअर इंडियाचे विमान हायजॅक करण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे देशातील सर्व विमानतळांवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईतील एअर इंडियाच्या ऑपरेशन नियंत्रण सेंटरमध्ये फोन करुन विमान हायजॅक करण्याची धमकी शनिवारी देण्यात आली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, 'एक विमान हायजॅक करून पाकिस्तानात नेण्यात येईल.' दरम्यान, या घटनेनंतर देशातील सर्व विमानतळांना अति दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर विमानतळांची सुरक्षा व्यवस्था आधीच वाढविण्यात आली होती. मात्र, आज मुंबईतील एअर इंडियाच्या ऑपरेशन नियंत्रण सेंटरमध्ये आलेल्या धमकीच्या फोनमुळे ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (BCAS)ने सर्व विमानतळांना खबरदारीचे निर्देश जारी केले आहेत. यात टर्मिनल आणि ऑपरेशन क्षेत्रात जाण्यापूर्वी कसून तपासणी आणि गाड्यांची तपासणी तसेच प्रवासी, कर्मचारी, सामान, कॅटरिंग आदींची कडेकोट तपासणीचे आदेश दिले आहेत.