नाट्यप्रवेश अभिवाचन स्पर्धेत ऐश्वर्या पाटील प्रथम
By संजय घावरे | Published: October 4, 2023 09:54 PM2023-10-04T21:54:57+5:302023-10-04T21:56:20+5:30
स्मिता तळेकर यांना लक्षणीय सादरीकरणासाठी गौरवण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नाटककार, पटकथा लेखक मधुसूदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त माहीम सार्वजनिक वाचनालयात नाट्यप्रवेश अभिवाचन स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच पार पडली. यात ऐश्वर्या पाटीलने प्रथम, विवेकानंद खतगांवकर यांनी द्वितीय, तर अदिती वेलणकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. स्मिता तळेकर यांना लक्षणीय सादरीकरणासाठी गौरवण्यात आले.
या नाट्यप्रवेश अभिवाचन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत ६० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातून अंतिम फेरीसाठी आठ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. अंतिम फेरीचे परीक्षण अवधूत परळकर, अविनाश कोल्हे व दिनेश शेट्टी यांनी केले. या स्पर्धेत कालेलकर यांच्याच एखाद्या नाटकातील प्रवेश सादर करण्याचे बंधन स्पर्धकांवर होते. नाट्यसंहिता नीट वाचल्यास लेखकाने 'बिटविन दी लाइन्स' काय म्हटलेय आणि संहितेतील शब्द वा वाक्यांतून त्याला काय सांगायचेय हे समजते. त्यासाठी नाट्यसमीक्षा वाचा आणि विविध प्रकारची चांगली एवढेच नव्हे, तर वाईट नाटकेही पाहा, अशा स्वरूपाचे विचार परीक्षकांनी स्पर्धकांसमोर मांडले.