मुंबई - महानायक अमिताभ बच्चन यांच्या पाठोपाठ पुत्र अभिषेक बच्चन यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अभिषेक यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. यानंतर आता ऐश्वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांचीही कोरोना चाचणी झाली. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. शनिवारी रात्री उशिरा अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे या दोघांनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत होती. त्यानंतर त्यांनी स्वत:ची कोरोनाची चाचणी करुन घेतली. त्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात त्यांच्या अजून काही चाचण्या करण्यात येणार आहेत. अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच अनेक कलाकारांनी रिट्विट करत त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना केली आहे.
अमिताभ यांच्या पाठोपाठ पुत्र अभिषेक बच्चन यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अभिषेक यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अभिषेक बच्चन यांनीही आपल्याला कोरोना झाल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. वडील व मला दोघांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत होती. आम्ही याची संबंधित यंत्रणेला माहिती दिली होती. आमचे कुटुंब व स्टाफची चाचणी केली जात आहे. या काळात लोकांनी शांत राहावे घाबरू नये, अशी मी विनंती करतो, असं म्हटलं आहे. बच्चन यांच्या स्टाफचीही चाच़णी करण्यात आली असून अहवाल अद्याप आलेले नाहीत.