"ऐश्वर्या राय माझ्या मुलीसारखी"; माशावरील विधानावर मंत्री गावितांचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 12:43 PM2023-08-22T12:43:36+5:302023-08-22T13:16:44+5:30
मंत्री गावित यांच्या विधानानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली.
मुंबई/धुळे - आता, भाजपा नेते आणि मंत्री विजयकुमार गावित यांनी अभिनेत्री ऐश्वर्या रायबद्दल असंच विधान केलंय. सध्या ते आदिवासी विकास खात्याचे मंत्री आहेत. ''नियमित मासे खाल्ल्यामुळेच ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर झाले'' असं विधान विजयकुमार गावित यांनी केलं होतं. मासे खाण्याचे फायदे सांगताना भावनेच्या भरात गावित यांनी ऐश्वर्या रायच्या डोळ्यांचे उदाहरण दिलं. तसेच मासे खाल्याने त्वचा चिकनी होत असल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली. त्यामुळे, गावित यांनी स्पष्टीकरण देत माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं म्हटलं.
मंत्री गावित यांच्या विधानानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली. तर, त्यांच्याच पक्षातील नेत्यांनीही सावध भूमिका घेतल्याचं दिसून आलं. त्यामुळे, अखेर गावित यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिलं. ''ऐश्वर्या राय माझ्या मुलीसारखी आहे, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मासे खाण्याचे, म्हणजेच फिश ऑईलचे आरोग्यासाठीचे फायदे मी आदिवासी लोकांना समजावून सांगत होतो. आरोग्यासाठी मासे चांगले आहेत, हेच सांगण्याचाय यामागचा उद्देश होता,'' असेही गावित यांनी म्हटलंय.
काय म्हणाल्या चित्रा वाघ
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीदेखील विजयकुमार गावित यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ''मी त्यांच्याशी सविस्तर बोलले. त्यांनी मला सांगितले की, आदिवासी विभागात माझा कार्यक्रम होता आणि आदिवासी तरूणांनी मासेमारी करावी यासाठी तो उपक्रम होता. त्यामुळे, मासे खाल्ल्याने काय फायदे होतात हे ते सांगत होते. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. पण, कोणीही असो बोलताना तारतम्य बाळगलंच पाहिजे, असे चित्रा वाघ यांनी म्हटलं.
गावित यांचे ऐश्वर्या राय बद्दलचे विधान
''तुम्ही ऐश्वर्या राय बघितली ना? त्यांनी काही सांगितलं की नाही ऐश्वर्या रॉयबद्दल? ती समुद्राच्या किनारी राहणारी. बेंगलोरची समुद्राच्या किनारी राहणारी. ती दररोज मासे खायची. बघितले ना तिचे डोळे? तसे तुमचेही डोळे होणार. हाही एक फायदा आहे'', असे म्हणत विजयकुमार गावित उपस्थितांना मासे खाण्याचे फायदे सांगितले. मासे खाल्ले ना तर बाईमाणूस चिकनी दिसायला लागतात, असेही गावित यांनी म्हटलं. माशात एकप्रकारचं तेल असतं. त्या तेलामुळे त्वचाही चांगली दिसते, असे फायदे गावित यांनी सांगितले होते.