‘अजंठा कॅटमरॉन’चा परवाना निलंबित; सागरी मंडळाची त्रिसदस्य समिती करणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 05:49 IST2025-04-13T05:48:55+5:302025-04-13T05:49:55+5:30
अजंठा कॅटमरॉन बोट दुर्घटनेची दखल घेत राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

‘अजंठा कॅटमरॉन’चा परवाना निलंबित; सागरी मंडळाची त्रिसदस्य समिती करणार चौकशी
अलिबाग : गेटवे ऑफ इंडिया-मांडवा सागरी मार्गावरील अजंठा कंपनीच्या कॅटमरॉन प्रवासी बोटीला समुद्रात शुक्रवारी (दि. ११) संध्याकाळी छिद्र पडल्याने १३० प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. त्यामुळे दुर्घटनाग्रस्त बोटीचा प्रवासी वाहतुकीचा परवाना हा तत्काळ निलंबित करण्यात आला आहे. तसेच नोंदणी आणि सर्व्हे प्रमाणपत्रदेखील निलंबित करण्यात आले आहे.
अजंठा कॅटमरॉन बोट दुर्घटनेची दखल घेत राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. यासाठी त्रिसदस्य चौकशी समिती महाराष्ट्र सागरी मंडळाने स्थापन केली असून, ती या दुर्घटनेची चौकशी करणार आहे. तीन दिवसात समिती अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे.
समितीत कोण?
सागरी मंडळाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये यांनी त्रिसदस्य समितीची घोषणा केली असून, सागरी अभियंता चीफ सर्व्हेअर प्रकाश चव्हाण हे या समितीचे अध्यक्ष आहेत.
बांद्रा येथील प्रादेशिक बंदर अधिकारी सी. जे. लेपांडे हे सदस्य, तर सागरी सुरक्षा व संरक्षण अधिकारी कमांडंट संतोष नायर हे समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
हलगर्जीपणा खपवून घेणार नाही
प्रवासी बोट सायंकाळी १३० प्रवाशांना घेऊन मांडवा येथे जाण्यास निघाली होती. मांडवा जेट्टीपासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर असताना बोटीमध्ये पाणी शिरले. नंतर अपघातग्रस्त बोटीवरील प्रवाशांना दुसऱ्या बोटीमध्ये घेऊन मांडवा जेट्टी येथे सुखरूप पोहोचवले. अशा प्रकारच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत असताना अशा घटना टाळण्यासाठी बोटींची नोंदणी, तांत्रिक बाबींबाबत सुस्पष्ट नियमावली तयार करण्याचे निर्देशही नितेश राणे यांनी दिले.