मुंबई - राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिल्यानंतरही मनोज जरांगे आंदोलनावर ठाम आहेत. त्यानुसार, २४ फेब्रुवारीपासून त्यांनी रास्तारोको आंदोलनाची घोषणाही केली आहे. तर, जरांगे हेकेखोर आहेत, त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठका झाल्या, असे म्हणत मराठा आरक्षण आंदोलनातील त्यांचे साथीदार म्हणणारे अजय महाराज बारसकर यांनी जरांगेंच्या विरोधात भूमिका घेतली. त्यानंतर, बारसकर यांना एका मंत्र्याने बोलायला लावलं असून ४० लाख रुपये घेऊन बारसकर ही बडबड करत असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.
मराठा आरक्षण आणि जरांगे आंदोलन प्रकरणात आता राजकारण रंगल्याचं दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बारसकर यांच्या भूमिकेवरुन सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर, आज मनोज जरांगे यांनीही पत्रकार परिषदेत बारस्कर हे ४० लाख रुपये घेऊन माझ्याविरुद्ध बोलत आहे. तसेच, त्याच्यावर सरकारमधील एका मंत्र्याने दबाव आणल्याचंही जरांगे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, बारसकर आणि जरांगे यांच्यातील वादावरुन आता मराठा समाजही आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे.
''अजय बारसकर याच्यावर बलात्काराचे आरोप महिला करतात. हा ट्रॅप आहे. मुख्यमंत्र्यांचा प्रवक्ता आणि देवेंद्र फडणवीसांचा एक नेता, यांनी मिळून जरांगेंच्या विरोधात बोल असं त्याला बजावलं आहे. बारसकर कोण आहे हे माहिती नाही. माझ्याविरोधात बोलण्यासाठी ४० लाख रुपये घेतल्याची माहिती'', असल्याचा गंभीर आरोपही जरांगे यांनी केलां. तसेच, एका दिवसांत एवढे चॅनल त्याला उपलब्ध झाले. १९ वर्षात मला चॅनल मिळाले नाही. मी १९ वर्ष संघर्ष करतोय. जो कोणी बडा नेता याच्यामागे आहे, तुम्ही बारसकरला साथ दिली तर तुमच्या पक्षाचे वाटोळे होईल, असेही जरांगे यांनी म्हटले.
ते प्रकरण उघडं करण्याचा दबाव
अजय बारसकर यांनी महिलेवर बलात्कार केल्याचे त्यांच्या गावातील लोक सांगत आहेत. हे ट्रॅप आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रवक्त्याचा आणि तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक बडा नेता आहे. ज्या महिलेचा विनयभंग झाला ते प्रकरण दाबलं गेलं आहे. ते प्रकरण उघडं करू नाहीतर तू जरांगेंच्या विरोधात बोल, असा दबाव त्याच्यावर आहे, तो आमदार बच्चू कडू यांच्यासोबत येत होता. आम्ही त्याला मानतही नाही, तो कोण आहे ते आम्हाला माहिती नाही, असंही मनोज जरांगे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
लग्नसोहळे संध्याकाळी करा - जरांगे
३ मार्चच्या रास्ता रोकोची तयारी महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाने करावी. ३ तारखेचा रास्ता रोको अशारितीने झाला पाहिजे की भारतात याआधी कधी झाला नसेल. ताकदीने जिल्ह्यातील लोकांनी बाहेर यावे. लाखोंच्या संख्येने शांततेने रास्ता रोको, एकाच वेळी एकाच ठिकाणी राज्यभरात रास्ता रोको करायचा आहे. सकाळी ११ ते १२ वेळेत हे करायचे आहे. ३ मार्चचे लग्नसोहळे संध्याकाळी ढकलावेत असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. संध्याकाळी लग्न ठेवलं तर लग्नाला येणाऱ्यांची गैरसोय होणार नाही. लोक रास्ता रोको करणार आहेत. त्यामुळे मराठा समाजासह इतर समाजातील बांधवांनी स्वत:हून पुढाकार घेऊन मुहूर्त पुढे ढकलावेत.