Join us

'अजय देवगणजी, तानाजी मालुसरेंच्या वंशजांना एवढी रक्कम द्या, मनसेची मागणी' 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 10:56 AM

ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी नुकतेच चित्रपटाच्या सातव्या आठवड्याच्या कमाईचे

मुंबई - अभिनेता अजय देवगण, काजोल, सैफ अली खान यांच्या अदाकारीने सजलेला ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ या सिनेमाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड अद्यापही थांबलेली नाही. चित्रपट प्रदर्शित होऊन 46 दिवस झालेत पण चित्रपटाची कमाई मात्र नॉनस्टॉप सुरु आहे. भारतात आत्तापर्यंत या सिनेमाने 276.92 कोटींचा बिझनेस केला आहे. त्यामुळे, अजय देवगणसह चित्रपटाची संपूर्ण टीम आनंदी आहे. आता, मनसेनं अजय देवगण यांना तान्हाजी यांच्या कुटुंबीयांस मदत करण्याचे आवाहन केलं आहे. 

ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी नुकतेच चित्रपटाच्या सातव्या आठवड्याच्या कमाईचे आकडे शेअर केलेत. सातव्या आठवड्यातील गत शुक्रवारी ‘तान्हाजी’ने 52 लाखांची कमाई केली. शनिवारी 63 लाख आणि रविवारी 74 लाख रूपयांचा गल्ला जमवला. याचसोबत चित्रपटाच्या एकूण कमाईचा आकडा 276.90 कोटी रूपयांवर पोहोचला आहे. त्यानंतर, आज मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विट करुन अजय देवगण यांच्याकडे मदतीची विनंती केली आहे. तान्हाजी मालुसरे यांच्या वंशजांना 2 कोटी रुपये मदत करा, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

तान्हाजी चित्रपट अतिशय चांगला असून मी स्वत: दोनवेळा पाहिला आहे. तर, चित्रपटाने सुमारे 300 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे, सध्या कठिण परिस्थितीत जगणाऱ्या तान्हाजी मालुसरे यांच्या वारसांना मदतीचा हात तुम्ही द्यावा. तुम्ही पुढाकार घेऊन या कुटुंबाला 2 कोटी रुपयांची मदत करावी, अशी विनंती बाळा नांदगावकर यांनी केली आहे. तसेच, आपण ही मदत केल्यास संपूर्ण महाराष्ट्र आणि मराठी माणूस आपला आभारी राहिल, असेही त्यांनी म्हटलंय.    

दरम्यान, जागतिक स्तरावरही ‘तान्हाजी’ चित्रपटाने विक्रम केला आहे. होय, या सिनेमाने 41 दिवसांत जगभरात तब्बल 347 कोटींवर बिझनेस केला आहे. या कमाईसोबत ‘तान्हाजी’ जगभरात सर्वाधिक कमाई करणारा 16 वा सिनेमा ठरला आहे. जानेवारीच्या दुस-या आठवड्यात ‘तान्हाजी’ रिलीज झाला आणि बघता बघता या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले. इतकी की, दरदिवशी या सिनेमाने सरासरी 50 ते 60 लाखांची कमाई केली. 

टॅग्स :मनसेतानाजीबाळा नांदगावकरपुणे