शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याची केली हाेती मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शेतकऱ्यांना पाठिंबा देऊन त्यांच्या बाजूने उभे राहा, अशी विनंती करण्यासाठी मंगळवारी अभिनेता अजय देवगण याची कार पंजाबच्या एका तरुणाने अडवली. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी त्याला अटक केली असून, चौकशी सुरू आहे.
संतोषनगर नाला परिसरात मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास काही काम सुरू असल्याने रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. त्याचदरम्यान अजय देवगण त्याच्या कारमध्ये बसून चित्रीकरणासाठी फिल्मसिटीला निघाला होता. त्या वेळी राजदीप रमेशकुमार सिंग (२८) हा रिक्षात बसलेला तरुण रस्त्याच्या मधोमध उभा राहिला आणि त्याने अजय देवगणची गाडी अडवून ‘कारमधून बाहेर या, मला तुमच्याशी बोलायचे आहे,’ असे सांगितले. अजयचे अंगरक्षक गाडीबाहेर आले आणि त्यांनी सिंगला हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र तो त्याच्याशी हुज्जत घालत अजयला शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहा, अशी विनंती करू लागला.
याबाबत दिंडाेशी पोलिसांना समजताच त्यांनी त्याला अटक केली. तो मूळचा पंजाबच्या लुधियानाचा राहणारा असून अभिनेत्री किंवा साईड कलाकारांच्या गाडीवर चालक म्हणून कार्यरत आहे. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धरणेंद्र कांबळे यांनी सांगितले.