Join us

अजय देवगणची कार अडविणाऱ्याला जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गोरेगाव परिसरात मंगळवारी अभिनेता अजय देवगण याची कार अडवून त्याला ‘शेतकऱ्यांना पाठिंबा दे,’ असे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गोरेगाव परिसरात मंगळवारी अभिनेता अजय देवगण याची कार अडवून त्याला ‘शेतकऱ्यांना पाठिंबा दे,’ असे सांगत हुज्जत घालणाऱ्या शेतकरी तरुणाला जामीन देण्यात आला. रात्री उशिरा पोलिसांनी त्याची सुटका केली.

राजदीप रमेशकुमार सिंग (२८) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तो जामीनपात्र असल्याने मंगळवारी रात्री त्याच्या वकिलांनी त्याची सुटका केली. त्याला जामिनावर सोडण्यात आले. त्याचा जबाब नोंदविल्याची माहिती बुधवारी दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धरणेंद्र कांबळे यांनी दिली. सिंग याला दिंडोशी पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली होती. संतोषनगर येथील फिल्मसिटी रोडवर त्याने अजय देवगणची कार अडवली. आंदाेलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याची मागणी केली. तसेच त्याला अपमानास्पद बोलला. अजयचा अंगरक्षक प्रदीप गौतम याने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. अखेर गौतमच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सिंगला अटक केली होती.

* अजयवर फॅन्सचा ‘हल्लाबोल’!

घडलेल्या या प्रकरणानंतर अजयच्या फॅन्सनी नाराजीच्या कमेंट्स आणि पोस्ट केल्या. अजयसोबत जे घडले तशीच काहीशी कथा तो मुख्य भूमिकेत असलेल्या ‘हल्लाबोल’ या चित्रपटाची आहे. यात एका छाेट्या शहरातील मुलगा अश्फाक यशाच्या शिखरावर चढत मोठा सुपरस्टार होतो. मात्र त्याच्या डोळ्यादेखत झालेल्या एका गुन्ह्याबाबत सिस्टीमच्या भीतीने साक्ष देण्यास पाठ फिरवतो. त्यावेळी पथनाट्याद्वारे जनजागृती करणारे आणि त्याच्या गुरूच्या भूमिकेत दाखविलेले सिद्धू (पंकज कपूर) त्याची कानउघाडणी करतात. अजयच्या गोरेगावमधील व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्येही अशाच प्रकारे जाब विचारताना सिंग दिसत आहे. त्या चित्रपटात म्हणजे रील लाईफ आणि शेतकरी आंदोलनाबाबत रियल लाईफमध्ये अजयने साधलेली ‘चुप्पी’ अनेकांच्या नाराजीचे कारण ठरत आहे. अनेक फॅन्सने या चित्रपटाचा उल्लेख कमेंट करताना करून अजयवर हल्लाेबाेल केल्याचे दिसून येत आहे.

................................