फडणवीसांना भेटण्यासाठी अजय महाराज बारस्कर सागर बंगल्यावर, पण पोलिसांनी घेतलं ताब्यात; काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 02:48 PM2024-07-20T14:48:15+5:302024-07-20T14:48:55+5:30

अजय महाराज बारस्कर हे थेट भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी दाखल झाले होते.

Ajay Maharaj Barskar at Sagar bungalow to meet devendra Fadnavis but later detained by police what happened | फडणवीसांना भेटण्यासाठी अजय महाराज बारस्कर सागर बंगल्यावर, पण पोलिसांनी घेतलं ताब्यात; काय घडलं?

फडणवीसांना भेटण्यासाठी अजय महाराज बारस्कर सागर बंगल्यावर, पण पोलिसांनी घेतलं ताब्यात; काय घडलं?

Devendra Fadnavis ( Marathi News ) :मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे वादात सापडलेले अजय महाराज बारस्कर आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण अजय महाराज बारस्कर यांची गाडी पंढरपूरमध्ये ऐन आषाढी एकादशी दिवशी जळाली. जरांगे पाटील यांचे समर्थक व मराठा आंदोलकांकडून गाडी जाळण्यात आली असल्याचा आरोप बारस्कर यांनी केला होता. त्यानंतर आज अजय बारस्कर हे थेट भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी दाखल झाले. मात्र त्यांना फडणवीस यांची भेट न मिळू शकल्याने बारस्कर यांनी सागर निवासस्थानाबाहेर ठिय्या मांडला होता. परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी अखेर पोलिसांनी बारस्कर यांना ताब्यात घेतलं आहे.

अजय महाराज बारस्कर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "माझी गाडी पेटवून देण्यात आली आहे. माझ्या घरावरही हल्ला करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे. मराठवाड्यातील जे मराठे आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, या मागणीसाठी मी फडणवीसांच्या घराबाहेर उपोषणाला बसणार आहे," अशी भूमिका बारस्कर यांनी घेतली होती. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत तेथून पोलीस ठाण्यात नेलं.

आषाढी एकादशीला पंढरपुरात काय घडलं?

अजय महाराज बारस्कर यांनी त्यांची दहा लाख रुपये किंमतीची एमएच १२ बीपी २००१ या क्रमांकाची कार चंद्रभागा नदी पलीकडील ६५ एकर येथील पार्किंगमध्ये पार्क केली होती. ही कार आषाढी एकादशी (बुधवार) दिवशी दुपारी दोनच्या सुमारास जळाली आहे. मात्र याबाबतची माहिती गुरूवारी पोलिसांनी माध्यमांना दिली. ही कार जाळून त्यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची तक्रार अजय साहेब बारस्कर ( वय ४४, भंडार डोंगर, सुदवडी देहू, ता. मावळ, जिल्हा पुणे) यांनी दिली आहे. कारला आग कशामुळे लागली. कोणी लावली याच्या मागे कोणी आहे का नाही याचा तपास पोलीस करत आहेत. याबाबत अजय महाराज बारस्कर यांना विचारले असता त्यांनी कार जाळण्यामागे जरांगे पाटील यांचे समर्थक असल्याचा दावा केला होता.
 

Web Title: Ajay Maharaj Barskar at Sagar bungalow to meet devendra Fadnavis but later detained by police what happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.