मुंबई :मनोज जरांगे-पाटील यांचे एकेकाळचे सहकारी आणि मराठा आरक्षण लढ्यातील त्यांचे साथीदार अजय महाराज बारसकर यांनी जरांगेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. जरांगे यांना कायद्याचे ज्ञान नाही. जरांगे हे रोज पलटी मारतात. सातत्याने भूमिका बदलतात आणि नेहमी खोटे बोलतात, असा आरोप बारसकर यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषदेत केला.
शिशूपालाप्रमाणे जरांगेंचेही १०० अपराध आता भरले आहेत. जरांगे यांनी २३ डिसेंबर रोजी गुप्त बैठक कन्हैया हॉटेलमध्ये घेतली. त्या बैठकीचा मी साक्षीदार आहे. तिथे जरांगे बैठकीत एक बोलले आणि बाहेर माध्यमांसमोर दुसरेच बोलले. मी योग्यवेळी ते जाहीर करेन, असेही बारसकर यांनी सांगितले. मुंबईला मोर्चा निघाला असताना रांजणगाव गणपती येथे पहाटे चार वाजता जरांगे यांची एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. या अधिकाऱ्याने या बैठकीचे रेकॉर्डिंग केले आहे. ते लवकरच निवृत्त होतील आणि जरांगेंचे बिंग फुटेल, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
संतांचा अवमान केला
मध्यंतरी जरांगे-पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी मी अंतरवाली सराटी येथे गेलो होतो. मी त्यांना माझ्या हाताने पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. मी देहूवरून आलो असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करत असताना जरांगे यांनी संतांचा अवमान करणारे विधान केले. त्यामुळे मी दुःखी झालो. त्यामुळेच आता मी जरांगेंची पोलखोल करत आहे, असेही बारसकर म्हणाले.
‘प्रहार’मधून हकालपट्टी
बारसकर हे बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे पदाधिकारी होते, जरांगेंवर आरोप केल्यानंतर त्यांची ‘प्रहार’मधून हकालपट्टी करण्यात आली आहे.
मला बदनाम करण्याचा सरकारचा ट्रॅप : जरांगे
वडीगोद्री (जालना) : तुकाराम महाराजांच्या आडून मला बदनाम करण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. त्यांच्यात हिंमत नव्हती, कायद्याचे मला ज्ञान नाही तर कशाला आले सरकारचे प्रतिनिधी? बारसकर यांच्याबद्दल मला प्रश्न विचारू नका, याला तुमच्या हेड ऑफीसने लगेच लाइव्ह घेतलेच कसे? याचा अर्थ यामागे सरकारचा मोठा ट्रॅप आहे, अशा शब्दात मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे - पाटील यांनी बारसकर यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले.
तो बारसकर बच्चूभाऊंसोबत वही घेऊन सहभागी झाला होता. उपोषणावेळी मी त्यांना बोललो होतो. व्यासपीठाच्या खाली व्हा. पण, हा ट्रॅप आहे. माझ्याकडे सगळ्या रेकॉर्डिंगसुद्धा आहेत. आतापर्यंत मी गोड होतो, ट्रॅपमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा एक प्रवक्ता, त्याचा नेता सगळे आहेत. सरकारने ट्रॅप बंद करावा, त्यांना जड जाईल, असेही जरांगे म्हणाले.
...तर माफी मागतो
बारसकर हे कसले महाराज? तुकाराम महाराजांबद्दल शब्द गेले असतील तर मी लीन होऊन माफी मागतोय. आयुष्यातील पहिली माफी आहे. उपोषण सोडताना बारसकरच्या हाताने पाणी पिलो नाही.
म्हणून असे प्रकार सुरू आहेत. मी वारकरी संप्रदायाला मानणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही तुकाराम महाराजांच्या आड लपून मराठ्यांच्या नादाला लागू नका, असेही जरांगे - पाटील म्हणाले. मराठ्यांना इमानदारीने सांगतो हे असे आरोप करून यांना मला लांब करायचा प्लॅन आहे. सरकारला आंदोलन फोडायचे आहे. सरकारने ट्रॅप बंद करावा, त्यांना जड जाईल. समाजाचा रोष घेऊ नका. ट्रॅप बंद करा नाहीतर मी तुमची नावे घेईन, असेही ते म्हणाले.