मुंबई : कनिष्ठ अभियंत्यांच्या पदोन्नती प्रकरणी मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता यांनी शुक्रवारी न्यायालयात हजेरी लावल्याने उच्च न्यायालयाने त्यांना अवमानाप्रकरणी बजावलेली ‘कारणे-दाखवा’ नोटीस रद्द केली. २५ कनिष्ठ अभियंत्यांना पूर्वलक्षित प्रभावाने बढती देऊ, असे आश्वासन महापालिकेने न्यायालयाला दिले.पदोन्नती न दिल्याने २५ कनिष्ठ अभियंत्यांनी दाद मागण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. महापालिका आयुक्तांनी त्यांना केस मागे घ्या, तुम्हाला पदोन्नती देऊ, असे आश्वासन दिले. त्या आश्वासनानुसार, संबंधित अभियंत्यांनी केस मागे घेतली. मात्र, केस मागे घेण्यात आल्यानंतर महापालिकेने त्यांना ठेंगा दाखविला. त्यामुळे संतापलेल्या अभियंत्यांनी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली.न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने थेट मेहता यांना हजर राहण्याचे आदेश दिले. त्यामुळे अजय मेहता यांनी शुक्रवारी न्यायालयात हजेरी लावली. ‘कोर्टात पालिकेसंदर्भात चालणाऱ्या अनेक प्रकरणांमध्ये पालिका आयुक्तांना न्यायालयाने दिलेले आदेश योग्यपद्धीने त्यांच्यापर्यंत पोहचविण्यात येत नाहीत. आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर राहायला सांगणे आवडत नाही. मात्र, आमचाही नाईलाज होतो,’ असे म्हणत न्यायालयाने अजय मेहता यांना बजावलेली कारणे-दाखवा नोटीसरद्द केली.
अजय मेहता यांच्यावरील अवमान कारवाई रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 12:52 AM