मुंबई - कमला मिल आग दुर्घटनेनंतर आतापर्यंत ५ जणांवर कारवाई करण्यात आली असून कोणालाही क्लीन चिट देण्यात आलेली नाही अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दिली आहे. अजॉय मेहता यांनी महापालिका सभागृहात निवेदन देताना ही माहिती दिली. त्यांनी यावेळी सांगितलं की, 'अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी सुरू आहे महिन्याभरात अहवाल येईल त्यानंतर कारवाई केली जाईल'.आतापर्यंत ६७० अनधिकृत बांधकामं तोडण्यात आली आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
'अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी काय काय करता येईल या संदर्भात सर्व अधिका-यांशी चर्चा केली. अग्निशमन यंत्रणांमध्ये सुधारणेची गरज आहे. आग विझवणारे आणि परवानगी देणारी वेगवेगळी यंत्रणा हवी', असं त्यांनी यावेळी सांगितलं. 'अग्निशमन अधिका-यांना मुंबईत हॉटेलमधे अग्निशमन यंत्रणांची कमतरता दिसेल, त्याच क्षणी ते हॉटेल रिकामे करून पोलिसांना बोलवून तात्काळ सील करणार', अशी माहिती त्यांनी दिली.
मानवाधिकार आयोगाची पालिका आयुक्तांना नोटीसकमला मिल कंपाउंडमधील जळीतकांडाची राज्य मानवाधिकार आयोगाने दखल घेतली आहे. यासंदर्भात २९ जानेवारी १८ पर्यंत विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता यांना दिले आहेत.
कमला मिल कंपाउंडमधील हॉटेल वन अबव्ह, मोजेस बिस्ट्रो येथे २९ डिसेंबरला लागलेल्या आगीत १४ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यापुर्वी काही दिवस आधी साकीनाका येथील फरसाण दुकानाला लागलेल्या आगीत १२ कामगारांचा बळी गेला होता. या दोन्ही दुर्घटनांमध्ये मानवी हक्कांची पायपल्ली झाल्याची तक्रार मुंबई भाजपाचे सरचिटणीस विवेकानंद गुप्ता यांनी मानवाधिकार आयोगाकडे केली.
१ जानेवारी रोजीच्या या तक्रारीची दखल घेत राज्य मानवाधिकार आयोगाने मुंबई महापालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे. त्यानुसार जळीतकांडाबाबत २९ जानेवारीपर्यंत विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश मानवाधिकार आयोगाने पालिका आयुक्त अजय मेहता यांना दिले आहेत. त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.