नवी दिल्ली - राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटींनी पाठींबा दिल्यानंतर आता वेगळेच वळण घेतले आहे. बाहेरच्या व्यक्तींनी भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये नाक खूपसू नये असा पलटवार देशातील अनेक सेलिब्रेटींनी केली. त्यात महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar),खासदार गौतम गंभीर, विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैनासह अजिंक्य रहाणेचाही समावेश आहे. सर्वांनीच इंडिया टुगेदर या हॅशटॅगने ट्विट केलंय. मात्र, अजिंक्य रहाणेनं ट्विटचा रिप्लाय ब्लॉक केला आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विट करत, भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती बघ्याची भूमिका घेऊ शकतात. मात्र, हस्तक्षेप करू शकत नाही. भारतीयांना भारत माहिती आहे आणि त्यांनी भारतासाठी निर्णय घ्यावा. देश म्हणून आपण सर्वजण एकत्र राहू, असे ट्विट सचिनने केले. या ट्विटसोबत #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda हे दोन हॅशटॅगही सचिनने वापरले आहेत. त्यानंतर, विराट कोहली, रोहित शर्मा, अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी यांनीही ट्विट करुन हा Propaganda भारतविरोधी असल्याची भूमिका घेतली. शेतकरी आंदोलनावरुन सुरु झालेल्या ट्विटर वॉरवर आता इतरही सेलिब्रिटी मैदानात उतरुन आपलं मत मांडत आहेत. तर, या खेळाडूंच्या आणि सेलिब्रिटींच्या ट्वटला रिप्लाय देत, त्यांच्यावर ट्विटर युजर्संकडून टीका करण्यात येत आहे. खेळाडूंना ट्रोल करण्यात येत आहे, सचिनलाही ट्रोल करण्यात आलंय. कदाचित याची पूर्वकल्पना असल्याने अजिंक्य रहाणेनं आपला रिप्लाय ब्लॉक करुन ठेवलाय.
आम्ही एकत्र असल्यास न सुटणारे असे कोणतेच प्रश्न नाहीत. त्यामुळे, चला आपण एक होऊ आणि आपल्या देशांतर्गत समस्येचं निराकरण करण्याच्या दिशेन कार्य करू, असे ट्विट अजिंक्य रहाणेनं केलंय. यासोबतच, India Together हा हॅशटॅगही त्याने दिलाय. मात्र, आपल्या ट्विटरचा रिप्लाय अजिंक्यने ब्लॉक केलाय. कदाचित, ट्विटरवर कमेंटमध्ये येणाऱ्या उत्तराची त्याला जाणीव होती, म्हणूनच त्याने रिप्लाय ब्लॉके केला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचं ट्विट
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय की, भारताच्या संसदेने व्यापक चर्चा आणि संवादानंतर कृषी क्षेत्राच्या संबंधित सुधारणा करणारे कायदे मंजूर केले आहेत. हा कायद्यामुळे शेतकऱ्यांना अधिक लवचिकता आणि विस्तीर्ण बाजारपेठ मिळू शकेल. ही सुधारणा आर्थिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत शेतीचा मार्ग आहेत. भारतातील काही भागातील शेतकऱ्यांचा छोटा गट या सुधारणांशी सहमत नाही. भारत सरकारने आंदोलकांच्या भावनांचा आदर करून त्यांच्या प्रतिनिधींशी संवाद सुरू केला आहे. या प्रयत्नात आतापर्यंत अकरा फेऱ्या झाल्या आहेत. ज्यामध्ये केंद्रीय मंत्री सहभाग घेत आहेत, केवळ सरकारच नाही,तर पंतप्रधानांकडूनही कृषी कायद्याला स्थगित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट करताना #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropagenda हा हॅशटॅग वापरला आहे.
रिहाना अन् मीना हॅरीस यांचं ट्विट
आंतरराष्ट्रीय गायिका रिहानाने ट्विटरवरून शेतकरी आंदोलनाबाबत आपण का बोलत नाही? असा सवाल केला त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर शेतकऱ्यांच्या आंदोलनाची चर्चा झाली. रिहानानंतर अमेरिकेच्या राष्ट्रपती कमला हॅरिस यांची पुतणी मीना हॅरिस, पर्यावरण कार्यकर्ते ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफा यांनीही शेतकरी मुद्द्यावरून ट्विट केले. मीना हॅरिसनं लिहिलं की, आपण सगळ्यांनी भारतात इंटरनेट शटडाऊन आणि शेतकरी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा हिंसाचार याचा निषेध व्यक्त केला पाहिजे. ट्विटरवरून गेल्या २४ तासांत रिहानाच्या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी केलं आहे.