मुंबई-
राज्यासह मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी हल्ला आणि घातपाताच्या धमक्या येत असताना भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी याची दखल घेतलेली दिसत आहे. कारण अजित डोवाल आज मुंबई दौऱ्यावर आले असून सकाळपासून त्यांनी भेटीगाठींचा सपाटा लावला आहे. अजित डोवाल मुंबईत येताच त्यांनी सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचीही भेट घेतली. पुढे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी ते पोहोचले आहेत. शिंदेंच्या भेटीनंतर ते पोलीस आयुक्त रजनीश सेठ यांचीही भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. डोवाल आज दिवसभर विविध आयपीएस अधिकऱ्यांनाही भेटणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
अजित डोवाल आज सकाळी मुंबईत पोहोचले आणि त्यांनी भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेतल्यानंतर त्यांच्यासोबत जवळपास अर्धा-पाऊणतास त्यांनी चर्चा केली. आता मुख्यमंत्री एकना शिंदेंच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ते पोहोचले आहेत. येत्या दोन-तीन दिवसात देशाचे गृहमंत्री अमित शाह देखील मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी डोवाल मुंबईत आले असल्याचीही शक्यता आहे. तसंच राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवादी कारवाया आणि धमकीचे फोन मुंबई पोलिसांना आले आहेत. तसंच रायगडच्या समुद्रकिनारी अज्ञात बोटीत एके-४७ बंदुका आढळून आल्याचंही प्रकरण समोर आलं होतं. या संपूर्ण घटनाक्रमांची माहिती घेण्यासाठी अजित डोवाल मुंबईत आल्याचं बोललं जात आहे.
महत्वाची बाब म्हणजे अजित डोवाल यांच्या मुंबई दौऱ्याबाबतची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. तसंच त्यांच्या दिवसभराचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला नव्हता. त्यामुळे अजित डोवालांच्या या दौऱ्याचं नेमकं कारण काय याची चर्चा आता सुरू झाली आहे.