Join us

खातेवाटप होताच अजित पवारांनी पदभार स्वीकारला, मंत्रालयाचा आढावाही घेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 5:18 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्याच्या वित्त व नियोजन विभागाच्या मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

मुंबई - प्रशासनावर पकड असलेला नेता आणि कामासाठी सकाळी ६ वाजता घर सोडणारा नेता म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांची महाराष्ट्राला ओळख आहे. राज्यात गेल्या काही दिवसांत घडलेल्या सत्तातर घडामोडीत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, गेल्या १० दिवसांपासून नवीन मंत्र्यांचे खातेवाटप रखडले होते. अखेर, आज खातेवाटपाला मुहूर्त मिळाला असून अजित पवार यांनी राज्याच्या अर्थ व नियोजन विभागाची जबाबदारी स्वीकारली. खातेवाटप होताच अजित पवारांनी पदभार स्वीकारत कामाला सुरुवातही केल्याचे दिसून येत आहे. त्यांचे अर्थमंत्रीपदी पदभार स्वीकारल्यानंतरचे फोटोही समोर आले आहेत. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्याच्या वित्त व नियोजन विभागाच्या मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तत्पूर्वी सकाळी त्यांनी दोन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेऊन वित्त व नियोजन विभागाच्या सद्यस्थितीची माहिती तसेच कामकाजाचा आढावा घेतला. अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, अतिरिक्त मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता यावेळी उपस्थित होते. अजित पवार यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या दालनातून कामकाजाला सुरुवात केली. सकाळी लवकर मंत्रालयात आलेल्या अजित पवार यांनी वित्त व नियोजन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर ते अभ्यागत नागरिकांना भेटले. 

पाहा फोटो https://twitter.com/ANI/status/1679813559117807616?s=20

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे कार्यालय मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरील 503 क्रमांकाचे दालनात असून या दालनातूनच ते आपल्या विभागांचे तसेच उपमुख्यमंत्रीपदाचे कामकाज पाहणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.  

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसमुंबईमंत्रालयअर्थव्यवस्था