Supriya Sule On Ajit Pawar ( Marathi News ) :लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सु्प्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली होती. यामुळे या मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असाच सामना होता. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, आता लोकसभा निकालाच्या दोन महिन्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मतदारसंघात उमेदवारीबाबत चूक झाल्याचं सांगितलं, यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू असून यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी फक्त तीनच शब्दात प्रतिक्रिया दिली.
बहिणीविरोधात पत्नी सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती, ती माझी चूक; अजित पवारांची जाहीर कबुली
लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघाची देशभरात जोरदार चर्चा झाली होती. या मतदारसंघात अजित पवार यांनी थेट खासदार शरद पवार यांनाच आव्हान दिलं होतं. उपमुख्यमंत्री पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवारी दिली होती. दोन्ही पक्षाकडून मोठी ताकद लावण्यात आली होती. या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांनी १ लाख ५८ हजार मतांनी विजय मिळवला.
'बहीणीविरोधात पत्नीला उमेदवारी द्यायला नको होती'
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'जय महाराष्ट्र' या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी बारामतीमधील उमेदवारीबाबत चूक झाल्याचे म्हटले. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, 'सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत, राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी आहे, मात्र सर्वच बहिणी माझ्या लाडक्या आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण चालतं. पण, राजकारण घरांमध्ये शिरू द्यायचं नसतं. लोकसभेला मात्र माझ्याकडून चूक झाली. मी माझ्या बहिणीविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. निवडणुकीवेळी पक्षाच्या पार्लमेंट्री बोर्डाना सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता, पण आज माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होतं, असंही अजित पवार म्हणाले. पवार यांच्या या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
दरम्यान, आता खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या स्टेटमेंटवर प्रतिक्रिया दिली. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'एकतर मी हे स्टेटमेंट ऐकलेलं नाही आणि वाटलेलं नाही. मी हे तुमच्याकडूनच हे ऐकते त्यामुळे राम कृष्ण हरी',अशी प्रतिक्रिया खासदार सुळे यांनी दिली.