मुंबई - राज्यात अतिवृष्टीसह नैसर्गिक आपत्तीचे अभूतपूर्व संकट आहे. लाखो हेक्टर क्षेत्रावरील पीकांचे मोठे नुकसान झाले असून राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांचा धीर खचत असून राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन तातडीने मदत देण्याची मागणी विरोधी पक्षाच्यावतीने करण्यात आली होती. मात्र, राज्यातील शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, सामान्य जनतेला धीर देण्याचे कोणतेही पाऊल सरकारने उचलले नाही, असे म्हणत विरोधकांनी आज सभात्याग केला.
जनतेला कोणतेही ठोस आश्वासन न देता केवळ तुटपुंज्या मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली आहे. सरकारने राज्यातील जनतेचा अपेक्षाभंग केला असल्याची टिका विरोधकांनी केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा सभागृहातून जोरदार घोषणाबाजी करत विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांनी सभात्याग केला. अतिवृष्टीवरील मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर प्रतिक्रीया देताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, राज्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे अभुतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे राज्यातील १८ लाख हेक्टर क्षेत्रावरच्या पीकाचं नुकसान झालं आहे.
पूरामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील जमिनी खरडून गेल्या असून त्या नापिक झाल्या आहेत. हजारो जनावरे वाहून गेली आहेत. मात्र, अद्यापही पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले नाही, शेतकऱ्यांना, नुकसानग्रस्तांना कोणतीही मदत देण्यात आलेली नाही. राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी विरोधी पक्षाच्यावतीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, सरकारने ती केलेली नाही. अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्याचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात आलेले नाही. गेल्या महिन्यापासून शेतमजूरांच्या हाताला कोणतही काम नसल्याने त्यांना एकरकमी मदत देण्याची मागणी करण्यात आली होती, ती मागणी सुध्दा पूर्ण करण्यात आलेली नाही.
मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग केला
राज्यात नुकसान झालेल्या शेतीला हेक्टरी ७५ हजार तर फळपीकांना हेक्टरी दीड लाखांची मदत देण्याची मागणी विरोधकांच्यावतीने करण्यात आली होती. मात्र, कालबाह्य निकषावर आधारीत ‘एनडीआरएफ’ आणि ‘एसडीआरएफ’च्या दुप्पट मदत करणार असल्याची नुसती धुळफेक सरकारने केली आहे. अजूनही नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत. मदतीची केवळ घोषणा सरकारकडून करण्यात आली असली तरी नुकसानग्रस्तांना मदत नेमकी कधीपर्यंत देण्यात येणार यावर काहीही भाष्य करण्यात आलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेल्या भाषणामुळे सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग झाला असल्याचा आरोप करुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षातील सदस्यांनी सभात्याग केला.