Join us

Ajit Pawar : अजित पवारांची 1000 कोटींची संपत्ती जप्त?, उपमुख्यमंत्र्यांचं उत्तर आलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2021 9:15 PM

आयकर विभागाकडून प्राप्त पत्राला कायदेशीर प्रक्रियेने उत्तर देणार;उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वकिलांची माहिती

ठळक मुद्देआयकर विभागाकडून काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. त्या पत्राला योग्य ते उत्तर देण्यात येईल. प्रशासकीय आणि कायदेशीर मार्गाने योग्य ती कार्यवाही केली जाईल, असंही अजित पवार यांच्या वकिलांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे

मुंबई - राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कोणत्याही संपत्तीवर आयकर विभागाने टाच आणलेली नाही. तसेच, त्यासंदर्भातील कोणतीही नोटीस अजित पवार यांना प्राप्त झालेली नाही. प्रसिद्धी माध्यमात यबाबत येत असलेले वृत्त निराधार, वस्तुस्थितीशी विसंगत, खोडसाळपणाचे आहे, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांच्या अटकेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. आयकर विभागाने अजित पवार यांच्याशी निगडीत ५ संपत्तीवर, जवळपास 1 हजार कोटींच्या संपत्तीवर जप्ती आणल्याचे वृत्त माध्यमांत झळकले होते. मात्र, अजित पवार यांच्याकडून हे वृत्त निराधार असल्याचे सांगण्यात आलंय. तसेच, कुठलिही संपत्ती जप्त करण्यात आली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आलंय. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रसारीत होत असलेल्या बातम्यांचे खंडन करताना त्यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील म्हणाले की, अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच आलेली नाही किंवा त्यासंदर्भात नोटीसही बजावण्यात आलेली नाही. आयकर विभागाकडून काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. त्या पत्राला योग्य ते उत्तर देण्यात येईल. प्रशासकीय आणि कायदेशीर मार्गाने योग्य ती कार्यवाही केली जाईल, असंही अजित पवार यांच्या वकिलांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रसिद्धीमाध्यमांनी वस्तुस्थिती तपासून बातम्या द्याव्यात व कुठलाही अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही अजित पवार यांच्या वकिलांतर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून अजित पवार(Ajit Pawar) आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात येत आहेत. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अजित पवारांच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार केली होती. बेनामी पद्धतीने संपत्ती गोळा करण्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. मोहन पवार हे जरंडेश्वर साखर कारखान्याचे एक मालक आहेत. पवार परिवाराचे जावई आणि अन्य सदस्यांच्या खात्यात कोट्यावधी रुपयांची ट्रान्सफर झाल्याची खळबळजनक माहितीही सोमय्या यांनी ट्विटरवरुन दिली होती.  

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसपुणेमुख्य आयकर आयुक्त कार्यालयगुन्हेगारी