Join us

Ajit Pawar: अजित पवारांची विशेष मुलाखत: "स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का?; मी राष्ट्रवादीतच राहणार"

By यदू जोशी | Published: April 19, 2023 7:08 AM

Ajit Pawar: माझ्याविषयी उगाच गैरसमज पसरविले जात आहेत. मी राष्ट्रवादीत आहे आणि राहील, जीवात जीव असेपर्यंत राहील. मी तुम्हाला हे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? असे म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार असल्याच्या वृत्ताचा मंगळवारी स्पष्टपणे इन्कार केला.

- यदु जोशीमुंबई : माझ्याविषयी उगाच गैरसमज पसरविले जात आहेत. मी राष्ट्रवादीत आहे आणि राहील, जीवात जीव असेपर्यंत राहील. मी तुम्हाला हे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? असे म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार असल्याच्या वृत्ताचा मंगळवारी स्पष्टपणे इन्कार केला. भविष्यात भाजपसोबत जाण्याबाबत पक्षाची जी भूमिका असेल तीच माझी भूमिका असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

अजित पवार भाजपसोबत जाणार, राष्ट्रवादी सोडणार वगैरे बातम्यांनी गेले तीनचार दिवस खळबळ उडवून दिलेली असताना अजित पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना त्यांची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर ते इतर माध्यमांना सामोरे गेले. शरद पवार हे माझे नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात काम करत आलो आहे. पक्षाच्या स्थापनेपासून मी पक्षाचा विचार सोडलेला नाही, पुढेही सोडणार नाही. आता माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, माझ्याविषयीचे गैरसमज थांबवा, असे आवाहनही त्यांनी केले. 

४० आमदारांना घेऊन अक्षय्य तृतीयेला आपण भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या आहेत...?अजित पवार : काही जण परस्पर बातम्या करायला लागले त्यात माझा काय दोष आहे? मी माझे काम करतोय. माझ्या परस्पर संजय शिरसाट, गुलाबराव पाटील काही बोलतात, मी काय करणार? मी स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का, की मी राष्ट्रवादी सोडून जाणार नाही म्हणून. प्रत्येक वेळी माझ्याचबद्दल संशयाचे जाणीवपूर्वक भूत काही जण तयार करत असतील तर त्यात माझा दोष नाही. माझे कार्यक्रम रद्द झाल्याचे कानावर आले म्हणून बातम्या चालवल्या, तसे काहीच नव्हते. आता प्रत्येकाला उत्तर द्यायला मी बांधील आहे का? मी एकाही आमदाराची सही घेतली नाही तर चाळीस आमदारांच्या सह्या घेतल्या म्हणून सांगितले जात आहे.

प्रश्न :  आपल्याविषयी बातम्या येण्यामागे कोण आहे, मीडिया आहे की आणखी कोणी? अजित पवार : आता मीडिया आहे की माझ्याबद्दल अति प्रेम ऊतू जाणारी व्यक्ती आहे, हे पण कळत नाही. मी प्रफुल्ल पटेल यांना घेऊन वा एकटा, अमित शहांना ना मुंबईत भेटलो, ना दिल्लीत भेटलो. मी किती वेळा सांगू, माझीही काही सहनशक्ती आहे ना ! अतिप्रेम व्यक्त करणारे काही लोक असतात. यानिमित्ताने त्यांना एखादी व्यक्ती डॅमेज व्हायला हवी असते. अशी इच्छा असलेले आतले म्हणजे माझ्या पक्षातले कोणीही नाही. ते का असतील? ज्या-ज्या वेळी प्रसंग येतो तेव्हा सगळे आमदार माझ्या पाठीशी असतात. उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेतेपद मला द्या, हे सगळ्या आमदारांनीच साहेबांना सांगितले होते.

प्रश्न :  महाविकास आघाडी सशक्त होत आहे म्हणून आपल्याविषयी बातम्या पसरविल्या जात आहेत का?  अजित पवार : प्रश्न अनेक आहेत. बेरोजगारी, महागाई आहे, कर्मचारी भरतीचा पत्ता नाही. शेतकरी चिंतेत आहेत. देशपातळीवर सत्यपाल मलिकांनी उपस्थित केलेल्या विषयासह अनेक राष्ट्रीय विषयही आहेत. ते सोडून  काठीला कॅमेरा लावून माझ्या बंगल्यावर येतात. पत्रकारांनीही सभ्यता बाळगावी. माझ्याबद्दलच्या बातम्यांमुळे आमच्या पक्षातील कार्यकर्ते, नेते उगाच विचलित होतात, हे बरोबर नाही.

प्रश्न :  पवार कुटुंबीयांमध्ये काही रुसवेफुगवे असल्याची चर्चा चॅनेलवरून होत असते, त्याचे काय? अजित पवार : रुसवेफुगवे कसले? काय कारण आहे सांगा, सुप्रियाचे क्षेत्र खासदारकीचे आहे, माझे बारामती विधानसभा आहे, रोहितचे कर्जत-जामखेड आहे. आम्ही सगळे वेगवेगळ्या संस्था बघतो. साहेब प्रमुख आहेत. नाराजी नाहीच.

भविष्यात भाजपसोबत जाणार का?n मी पक्ष सोडून जाण्याचा प्रश्नच नाही. मी आजही राष्ट्रवादीचा आहे, उद्याही राष्ट्रवादीचाच असेल; जीवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादीतच असेन. संपला विषय. भाजपमध्ये मी प्रवेश करणार, आमदार घेऊन जाणार असे पसरविले गेले त्यातही तथ्य नाही. n भविष्यात राष्ट्रवादीने भाजपसोबत जाण्याबाबत पक्षाची जी भूमिका असेल तीच माझी भूमिका असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. उद्या काही घडले तर मीच सांगेन. ज्योतिषाची गरज नाही. कोणी उगाच ध चा मा करू नका.

राहुल नार्वेकर जपान दौरा सोडून मुंबईतविधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जपानचा दौरा अर्धवट सोडून मुंबईच्या मार्गावर असल्याची माहिती आहे. त्यामुळे नक्कीच काही तरी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राष्ट्रवादीचे नेते एकत्र भेटलेअजित पवार, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे चार नेते मंगळवारी सायंकाळी कुलाब्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटल्याची खात्रीलायक माहिती आहे. यावेळच्या चर्चेचा तपशील समजू शकला नाही. 

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसभाजपामहाराष्ट्र