मुंबई : राष्ट्रवादीतील बंडखोर नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्रीअजित पवार हे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा पुन्हा एकदा जोर धरत आहेत. त्यातच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एका मुलाखतीत वेळ येईल तेव्हा अजित पवारांना ५ वर्षासाठी मुख्यमंत्री बनवू, असे सांगितल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, आता राष्ट्रवादीचे दुसरे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनीही अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर स्पष्टपणे उत्तर दिलंय.
जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या तत्कालीन सर्व मंत्र्यांसह सर्व आमदार हे जून २०२२ मध्येच भाजपसोबत जायला तयार होते; त्यांनी तसे शरद पवार यांना लेखी दिलेले होते, असा दावा राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गुरुवारी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. यादरम्यान, राज्यात एनडीएचं सरकार आल्यास अजित पवार मुख्यमंत्री होतील का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावरही, त्यांनी भूमिका स्पष्ट केली. पुढे काहीही होऊ शकतं. पण, सध्या एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आहेत. शिंदेंना देशातील सर्वात मोठ्या पक्षाने म्हणजेच भाजपानेच मुख्यमंत्री बनवले आहे, असे उत्तर प्रफुल्ल पटेल यांनी दिले.
दरम्यान, यावेळी, महाविकास आघाडीत राष्ट्रवादीसाठी मुख्यमंत्रीपदाचा प्रस्तावही ठेवण्यात आला होता, अशी माहिती त्यांनी दिली. शिवसेनेकडे ५६ आमदार आहेत, तर राष्ट्रवादीकडेही ५४ आमदार आहेत. त्यामुळे, अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आम्हाला मिळावं, अशी मागणी आम्ही केली होती. त्यानंतर, दुसरा प्रस्ताव उद्धव ठाकरेंकडे ठेवला होता. त्यानुसार, ३ वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि २ वर्षे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री, असा प्रस्ताव असल्याचंही पटेल यांनी मुलाखतीत सांगितलं.
जून २०२२ मध्ये काय होणार होते?
पटेल म्हणाले की, एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बंड करून सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले तेव्हाचीच ही घटना आहे. राष्ट्रवादीच्या सर्व ५१ आमदारांनी (अनिल देशमुख, नवाब मलिक सोडून; कारण ते तेव्हा तुरुंगात होते) शरद पवार यांना लेखी दिले होते की ते भाजपसोबत सरकार स्थापन करायला तयार आहेत. जयंत पाटील हे त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटायला जाणार होते. त्यांनी तसा कॉल शरद पवार यांना केला तेव्हा पवार यांनी त्यांना दोन-तीन दिवस थांबायला सांगितले. माध्यमांमध्ये फार चर्चा होईल, असे ते म्हणाले. त्यातच दोन-तीन दिवस निघून गेले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.
शिंदेंचं मुख्यमंत्री होणं आश्चर्यकारक
शिंदे यांचे मुख्यमंत्री होणे हे आमच्यासाठी आश्चर्यकारक होते; कारण देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे आम्हाला वाटले होते. पक्षातील सहा-सात नेत्यांना चौकशी एजन्सींचा त्रास होता म्हणून ते भाजपसोबत जाण्यास सांगत होते, या शरद पवार यांच्या विधानात तथ्य नाही.