मुंबई- बोलताय कोणाला, आपला आवाका किती, आपण साहेबांच्या बद्दल बोलताय, तेव्हा मला राहावलं नाही. तेव्हा मी बोलून टाकलं तुम्ही कसं निवडून येताय तेच पाहतो. त्याच्यावरही त्यांनी मला चॅलेंज दिलं की यांच्या हातात काय आहे. पण शेवटी मतदारांनीही विजय शिवतारेंना पाडून दाखवलं, असंही अजित पवार म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देता ते असं म्हणाले आहेत. आमच्या हातात काहीही नाही, शेवटी मतदारांच्या हातात आहे, असं म्हणत त्यांनी शिवतारेंवरही निशाणा साधला. पुरंदरच्या मतदारांना लाख लाख धन्यवाद, त्यांचे आभारही अजित पवारांनी व्यक्त केले आहेत.ते पुढे म्हणाले, विजय शिवतारे हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते होते. त्यानंतर ते शिवसेनेत गेले. कोणी कुठल्या पक्षात जावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण तिथे गेल्यानंतर पवार आणि सुप्रिया सुळेंच्या विरोधात सातत्यानं वेगळ्या प्रकारचं वक्तव्य करत होते. जे वक्तव्य कोणीही दुसरी व्यक्ती करू शकत नाही. अशा प्रकारचे ते वक्तव्य करायचे आणि एवढी घमेंड होती. एवढा मस्तवालपणा होता की मी खासगीत पण म्हटलं हे बरं नाही. मतभेद असतात पण कुठपर्यंत टीकाटिपण्णी करायची यालासुद्धा काही मर्यादा असतात. पण ते ऐकायलाच तयार नाही, शेवटी जनतेनंच त्यांना त्यांची जागा दाखवली, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारेंना काँग्रेसच्या संजय जगताप यांनी पराभूत केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची धमकी खरी ठरली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी शिवतारे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यात वाकयुद्ध रंगलं होतं. त्यावेळी पवार यांनी शिवतारेंना जाहीर धमकी दिली होती. 'यंदा बघतो तू कसा आमदार होतो ते,' अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी शिवतारेंना इशारा दिला होता. 'शिवतारे तर काय पोपटासारखा मीठू मीठू बोलू लागलाय.. अरे विजय शिवतारे, तुझं बोलणं किती.. तुझा आवाका किती.. तू बोलतोय कोणा बरोबर.. तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते.. बघतो मी.. अख्ख्या महाराष्ट्राला माहितीय, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाय करायचं तर कोणाच्या बापाला ऐकत नाही.. आम्ही म्हणतोय बाबा जाऊ द्या जाऊ द्या.. गप्प बसा गप्प बसा.. पण याचं तर उर भरून आलंय.. त्याला काय करू, काय नाय होतंय... आता 2019ला हा कसा आमदार होतो तेच मी बघणाराय', असं अजित पवार लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान म्हटलं होतं. पुरंदरमध्ये विजय शिवतारेंचा पराभव झाल्यानं अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीवेळी दिलेला इशारा खरा ठरला आहे. काँग्रेसच्या संजय जगताप यांनी शिवतारेंचा 30 हजार 820 मतांनी पराभव केला. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. विजय शिवतारेंना भरसभेत इशारा देणाऱ्या अजित पवारांनी बारामतीत विजयाच्या दिशेनं दमदार वाटचाल केली आहे. बारामतीत भाजपाच्या गोपीचंद पडळकरांसह सर्वच उमेदवारांचं डिपॉजिट जप्त केलं आहे.