Join us

सरकारला शरमेने मान खाली घालावी लागणारी ही घटना; अजित पवार संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2023 5:11 PM

येणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून आपल्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणली जातेय

मुंबई - मुंबईत वसतीगृहात मुलीवर अत्याचार होतो ही सरकारला शरमेने मान खाली घालावी लागणारी घटना आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला. वसतीगृहात मुलीवर झालेल्या अत्याचार व हत्येनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरले. विधान भवन आवारात ते पत्रकारांशी बोलत होते. 

अजित पवार म्हणाले की, आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पहाटे अशा घटना घडतात. मुंबईतच नव्हे तर राज्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात मुलींना, महिलांना सुरक्षित वाटले पाहिजे. मात्र असे घडताना दिसत नाही. याला पोलीस आणि सरकार जबाबदार आहे. वसतीगृहात वास्तविक त्या नराधमाला सुरक्षारक्षक म्हणून कसे नेमण्यात आले. यामध्ये वस्तुस्थिती काय आहे, कितीजणांनी हे कृत्य केले आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. 

तसेच ही झालेली घटना लक्षात घेऊन राज्यात जिथे- जिथे वसतीगृह आहेत तिथे सुरक्षेची व्यवस्था नीट आहे का याची माहिती घ्यावी. या घटनेचा तपास ज्यांच्याकडे आहे त्यांनी ताबडतोब खोलवर जाऊन धागेदोरे कुठपर्यंत जात आहेत आणि कोण जबाबदार आहे याचा छडा लावला पाहिजे असंही अजित पवार यांनी सांगितले. 

द्वेष निर्माण करण्याचं काम काही शक्ती जाणीवपूर्वक करतायेत का?आज कोल्हापूर बंद आहे. कोल्हापूरमध्ये कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणण्याच्या काही घटना जाणीवपूर्वक करण्यात आल्या त्याआधी सुद्धा वेगवेगळ्या भागात दंगली घडवून आणण्यासारखे प्रकार होत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अडचणीत येत आहे. येणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून आपल्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणून समाजा-समाजामध्ये अंतर पाडण्याचे काम किंवा द्वेष निर्माण करण्याचे काम काही शक्ती जाणीवपूर्वक करत आहेत का? त्यातून त्यांना वेगळा स्वार्थ साधायचा आहे का असा थेट सवाल अजित पवार यांनी केला.

त्याचसोबत अलीकडच्या काळात ज्या घटना घडत आहेत त्याच्याबद्दल खोलात जायचं म्हटलं तर मोबाईल कुणाचे, कुठे गेले आहेत. व्हॉटस्ॲपवर काय बातम्या आल्या आहेत. कुणी व्हायरल केले आहे. हे तपासायचं म्हटलं तर तपासता येतं. परंतु या गोष्टीचा छडा लागलाच पाहिजे अशा पद्धतीची भूमिका राज्यकर्त्यांची असली पाहिजे आणि पोलीस खात्याचे काम करणार्‍या अधिकारी वर्गाची असली पाहिजे असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

दरम्यान, औरंगजेबाचे समर्थन करण्याचे कारण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात त्याला कोण समर्थन देईल? त्यामुळे याला वेगळया प्रकारचे स्वरूप देऊ नका. अफजलखान असेल औरंगजेब असेल कुणीही त्यांचे समर्थन करणार नाही. अशाप्रकारच्या बातम्या पसरवून लोकांच्या मनात गैरसमज पसरवून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम होता कामा नये. जातीय सलोखा टिकवला गेला पाहिजे. गेले कित्येक वर्षे गुण्यागोविंदाने आपण रहातोय त्याला कुठेही डाग लागता कामा नये हेच पुढे चालू ठेवली पाहिजे असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

टॅग्स :अजित पवार