मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी गणिताच्या पुस्तकातील बदलला आपला विरोध दर्शवला आहे. शिक्षण पद्धतीतील हा बदल स्वागतार्ह नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले. तसेच, माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीच हा निर्णय घेतला असेल, म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून शिक्षण खाते काढून घेतल असेल. त्यामुळे, नवीन शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी बालभारती आणि गणिताच्या पुस्तकातील संख्यावाचनाचा हा बदल रद्द करण्याचा आदेश द्यावा, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.
विद्यार्थ्यांच्या मनातील गणित विषयाची भीती कमी व्हावी, यासाठी बालभारतीच्या दुसरी इयत्तेच्या गणिताच्या पुस्तकात संख्यावाचनात काही बदल सुचवण्यात आले आहेत. मराठीचे इंग्रजीकरण, मराठी अप्रिय करण्याचा घाट घालत करण्यात आलेला हा बदल मराठी भाषेची तोडफोड करणारा आहे, अशी तक्रार साहित्य वर्तुळातून केली जात आहे. गणिताच्या पुस्तकात 21 ते 99 या संख्यांचे वाचन व शब्दात लेखन यात बदल केला आहे. त्यानुसार, सत्त्यान्नवऐवजी नव्वद सात असे शिकवावे, असे सुचवण्यात आले आहे. शासनाने हा बदल थांबवावा, यासाठी निवेदन देण्याची भूमिकाही अनेकांनी जाहीर केली आहे. तर, भाषेची कोणत्याही प्रकारे तोडफोड होणार नसून, टीका करण्यापेक्षा बदल समजून घ्यावेत, असे आवाहन गणितज्ज्ञांकडून करण्यात आले आहे. या बदलाचे विधानभवनातही पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या बदलाचे उदाहरण देतान, ऊर्जीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाचा दाखल देत खिल्ली उडवली.
नवीन बदलानुसार, ऊर्जामंत्री बावनकुळे साहेबांना बोलवताना आम्ही... वो पन्नास दोन कुळे साहेब.... पन्नास दोन कुळे साहेब आले बघा... असं म्हणायचं का ? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच, मुख्यमत्री महोदयांच नाव घेताना, फडण दोन-शून्य असं म्हणायचं का ? असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. त्यानंतर, सभागृहात चांगलाच हशा पिकला होता. मात्र, गमतीचा भाग सोडून देत हा बदल स्विकाहार्य नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले. तसेच, बदल रद्द करण्याची मागणीही नवीन शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.