मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी लवकरच तृतियपंथीयांच्या कल्याणासाठी किन्नर बोर्ड स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन तृतियपंथींयांना दिलंय. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी याबाबत माहिती दिल्याचंही सुळेंनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत सुप्रिया सुळेंनी तृतियपंथीयांचे निवेदन त्यांना दिले.
तृतियपंथीयांच्या कल्याणासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारे व खुप दिवसांपासून प्रलंबित असणारे किन्नर बोर्ड लवकरात लवकर स्थापन करण्याचे आश्वासन सामाजिक न्याय मंत्री यांनी दिले आहे. याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले. धनंजय मुंडेंनी मंगळवारी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला. मंत्रालयातील कार्यालयात जाऊन त्यांनी पदभार स्विकारला. त्यानंतर, सर्वच वर्गातील समाजाच्या न्याय हक्कासाठी काम करेन, असे आश्वासन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंनी तृतीयपंथीयांसमवेत अजित पवार यांची भेट घेतली.
तसेच, धनंजय मुंडे, आणि राज्यमंत्री राजेश टोपे यांना आपल्या ट्विटरमध्ये टॅग करून लवकरात लवकर तृतियपंथीयांच्या कल्याणासाठी किन्नर बोर्ड सुरू करा, असे आवाहन केलं. तसेच, सर्वांना समान न्याय हक्क यासाठी आपण ठामपणे उभे राहिले पाहिजे, असेही सुप्रिया यांनी म्हटले आहे.