मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार मंगळवारी नागपुरातच होते; वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्यांचे अभीष्टचिंतन केले. पण, त्यांचे पुतणे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र त्यांना नागपुरात असूनही भेटायला गेले नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून पवार यांना शुभेच्छा दिल्या.
शरद पवार यांच्या वाढदिवशी ते आणि अजित पवार नागपुरात असले तरी दोघांच्या भेटीची शक्यता कमीच आहे, असे वृत्त ‘लोकमत’ने दि. १० डिसेंबरच्या अंकात दिले होते. ते खरे ठरले.
वाढदिवशी शरद पवार यांची भेट अजित पवार यांनी का टाळली, याबाबत चर्चा आहे. अजित पवार यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त ‘एक्स’वर अभिवादन केले. तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन केले. पण, काकांचे अभीष्टचिंतन करण्याचे मात्र टाळले.
एक आमदार भेटीला, दोन मंत्र्यांच्या शुभेच्छा
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून आ. दिलीप बनकर वगळता कोणीही आमदार, मंत्री हे शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले नाहीत.
मात्र, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह काही मंत्र्यांनी ‘एक्स’वर शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त सदिच्छा दिल्या.
शेतकरी प्रश्नी आंदाेलनानिमित्त शरद पवार नागपुरात आहेत. तेथे अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.