Join us  

मते फुटणार म्हणणाऱ्यांना दणका; अजित पवार यांनी दोन्ही उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांवर निवडून आणले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 7:31 AM

अजित पवार यांच्यासोबतचा एकही आमदार फुटला नाही. त्यांच्याकडे ४० आमदार आहेत.

मुंबई : आपल्याकडे असलेल्या आमदारांच्या मतांपेक्षा अधिक मते मिळवत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत:चे दोन्ही उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांवर निवडून आणले. ‘अजित पवार गटाची मते फुटणार,’ या चर्चेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. विजयानंतर विधानभवनात त्यांच्या समर्थकांनी ‘एकच वादा.... अजितदादा’ अशी घोषणा देत एकच जल्लोष केला.  

या निवडणुकीतील कच्चा दुवा म्हणून अजित पवार गटातील शिवाजी गर्जे यांच्याकडे पाहिले जात होते. अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीतील निष्ठावंत अशी ओळख असलेले गर्जे यांचे स्थान धोक्यात असल्याचे म्हटले जात होते. त्यातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे अजित पवारांचे काही आमदार शरद पवार यांच्या सांगण्यावरून जयंत पाटील यांना मतदान करतील, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा होती. ‘काही आमदार आपल्याकडे येऊ इच्छितात; पण मीच त्यांना सांगितले आहे की, आधी निधी वगैरे तिकडून घ्या आणि नंतर माझ्याकडे या,’ अशी गुगलीही शरद पवार यांनी टाकली होती. 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटात मोठी फूट पडेल आणि त्यांचे आमदार शरद पवार यांच्या गटात जातील, या चर्चेला गेले काही दिवस बळ मिळाले होते. 

बाहेरून खेचून आणली ७ मते 

निश्चिंत होत गुरुवारी रात्री उशिरा अजित पवार यांनी आपल्या निकटवर्तीयांना सांगितले की आपण जिंकलो आहोत, उद्या गुलालाची तयारी ठेवा. शुक्रवारच्या निकालात अजितदादांच्या या आत्मविश्वासाची प्रचिती आली. 

अजित पवार यांच्यासोबतचा एकही आमदार फुटला नाही. त्यांच्याकडे ४० आमदार आहेत. त्यांच्या दोन्ही उमेदवारांना मिळून ४७ मते मिळाली. याचा अर्थ सात मते त्यांनी बाहेरून खेचून आणली. 

स्वत: आखली रणनीती...

लोकसभा निवडणुकीत पराभवाचे चटके बसलेले अजित पवार अत्यंत सावध होते. गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते हजर नव्हते, उपराष्ट्रपतींच्या भाषणावेळीही नव्हते आणि नंतर विधानसभाध्यक्षांनी ठेवलेल्या चहापानालाही ते गेले नाहीत.

विधान परिषद निवडणुकीत आपले दोन्ही उमेदवार निवडून आणायचेच यासाठीची रणनीती आखत होते. आपल्या प्रत्येक आमदाराशी ते स्वत: बोलले. 

बाहेरून कोणती मते कशा पद्धतीने आणायची यासाठीही रणनीतीही त्यांनी आखली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल या रणनीतीत त्यांच्यासोबत होते. 

आजच्या निकालाने दुध का दुध, पानी का पानी झाले आहे. अजित पवारांचा गट फुटणार असे पसरविणाऱ्यांना निकालाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आमचे आमदार तर फुटले नाहीतच, उलट जास्तीची मते आम्हाला मिळाली - अजित पवार उपमुख्यमंत्री.

टॅग्स :विधान परिषदअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार