मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात वरिष्ठ नेत्यांनी, आमदार, खासदारांनी भाषणं केली. यावेळी, स्वबळावर सत्ता आणि राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री असावा, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. खासदार अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचा असेल असा विश्वासही यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या या सर्व नेत्यांच्या भाषणानंतर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या शैलीत भाषण केले. त्यावेळी, मनातील दु:ख बोलून दाखवत कार्यकर्त्यांना दमही भरला.
अजित पवार पुढे भाषणात म्हणाले की, आपला पहिला नंबर आला पाहिजे, सर्वात मोठा पक्ष झाला पाहिजे, असे मगा सगळेच म्हणाले. पण, केवळ भाषण देऊन पहिला नंबर येत नसतो. भाषणामधून स्फुर्ती, प्रेरणा आणि जोश मिळेल. पण, बोलणाऱ्यांनीही आपण ज्या भागातून येतो तेथे एकापो ठेवलाय का हे पाहिलं पाहिजे, त्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे, असे म्हणत राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात तुफान फटकेबाजी केली. तर, शरद पवारांसमोरच खंतही बोलून दाखवली.
मित्रांनो, २५ वर्षांच्या राजकीय जीवनात माझ्या मनात दु:ख आहे की, ममता बॅनर्जी एकट्याच्या जीवावर पश्चिम बंगाल जिंकू शकतात. अरविंद केजरीवाल दोन-दोन राज्यात सत्ता स्थापन करू शकतात. नितीश कुमार बिहारमध्ये त्यांचं वर्चस्व निर्माण करू शकतात. इकडे खाली आंध्रात गेलात तर चंद्रबाबू नायडू किंवा जगनमोहन रेड्डी सत्ता आणू शकतात. किंवा आता, तेलंगणात गेलात तर केसीआर म्हणजे बीआरएच पक्ष एकटयाच्या ताकदीवर सरकार स्थापन करू शकतात. आता, या सगळ्या नेत्यांची नावे घेतल्यानंतर या सर्वच नेत्यांमध्ये उजवा नेता शरद पवार हे आहेत की नाही?
होsss तुम्ही शिट्टया मारताय, टाळ्या वाजवताय. पण, महाराष्ट्रात कधी आपण एकट्याच्या बळावर राज्यात राष्ट्रवादी पक्ष निवडून आणू शकलोय का, असा सवाल विचारत अजित पवार यांनी मनातील दु:ख बोलून दाखवलं. तसेच, आपण विदर्भ आणि मुंबईत कमी पडतो. आपल्याला काय दिल्लीला जायचंय का, इथं मुंबईतच यायचंय ना. आपण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात वर्चस्व निर्माण केलं. तिकडे जगळगावमध्ये आपण ५-६ जागांवर आहोत. मग, मुंबईत का कमी पडतोय याचा अभ्यास केला पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले.
पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच
"पुढचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असला पाहिजे यासाठी आतापासूनच कंबर कसूया. यात अडथळे अनेक येतील हिंदुत्वाची गोळी घेऊन कोण आले तर त्यांना आरसा दाखवा. जो शिवछत्रपती यांचा असेल. पुढील मकर संक्रांतीला अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची स्थापना होणार आहे. तेव्हा पुन्हा उन्माद माजेल. पण धनुष्यबाण हाती घेतलेले व भुवया उंचावणारे प्रभू श्रीराम हवेत की कुटुंबवत्सल आशीर्वाद देणारे प्रभू श्रीराम हवेत, असे विचारावे लागेल", अशा शब्दांत कोल्हे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.