५० खोक्यांच्या प्रश्नावर अजित पवारांनीच दिलं उत्तर; शिवसेनेचे प्रमुख म्हणत शिंदेंचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 01:37 PM2023-08-05T13:37:09+5:302023-08-05T13:52:48+5:30
शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेनेच्या खात्यावर असलेली रक्कम कुणाला मिळणार हा प्रश्न उभा राहिला
मुंबई - राज्यात २०१९ नंतर मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. त्यात, शिवसेनेनं महाविकास आघाडीसोबत बनून सरकार स्थापन करणे आणि त्यानंतर शिवसेनेनंतर झालेला मोठा बंड. शिवसेनेतील फुटीनंतर पक्षात दोन गट पडले. गेल्या वर्षी शिवसेनेतील ५५ पैकी ४० आमदारांनी वेगळी भूमिका घेत भाजपासोबत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेतील हा वाद सध्या कोर्टात आहे. पण,निवडणूक आयोगाने शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच, अधिकृत शिवसेना सध्या शिंदेंकडेच असल्याचे बोलले जाते. त्यातच, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही यावर भाष्य केलं आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेनेच्या खात्यावर असलेली रक्कम कुणाला मिळणार हा प्रश्न उभा राहिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत एक पत्र दाखवून उद्धव ठाकरेंना टोला लगावला. त्यानंतर, बाहेर पत्रकारांच्या प्रश्नालाही उत्तर दिलं. यावेळी, या पत्रासंदर्भात पत्रकारांनी एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारला होता. त्यावर, अजित पवार यांनी उत्तर दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तसेच, अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उल्लेख शिवसेनेचे प्रमुख असाही केला. दरम्यान, अजित पवार यांनी गेल्याच महिन्यात भाजपासोबत महायुतीत येत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे, महाविकास आघाडीत असताना शिंदेंवर टीका करणारे अजित पवार आता शिंदेना शिवसेना प्रमुख म्हणत असल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं.
सुभाष देसाई आणि अनिल देसाई यांनी ते पत्र लिहिलं होतं. शिवेसनेच्या लेटरपॅडवर ते पत्र लिहिलं होत, त्यावर चिन्हाचाही वापर केला होता. वास्तविक चिन्ह व पक्षाची जी जबाबदारी आहे, ती इलेक्शन कमिशनने एकनाथ शिंदेंकडे सोपवली आहे. मात्र, मला त्या खोलात जायचं नाही, असे म्हणत अजित पवारांनी ५० कोटी रुपयांच्या पत्रावर भाष्य करताना मुख्यमंत्री शिंदेंची बाजू घेतल्याचं दिसून आलं.
त्या पत्रामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की, मागे काही डिपॉझिट ठेवलेलं होतं. ते डिपॉझिटचे पैसे आमच्याकडे वर्ग करा. त्यामध्ये, शिवसेनेचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुठलेही आडेवेडे न घेता ते पैसे तिकडे वर्ग केले, अशी माहितीही अजित पवार यांनी स्वत: दिली. हे सांगताना अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंना शिवसेनेचे प्रमुख म्हटल्याचे दिसून आले.
दरम्यान, या प्रश्नावर अजित पवार यांनी उत्तर द्यायला सुरुवात करताच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शांत बसले. अजित पवारांनी उत्तर दिल्यानंतर पुन्हा शिंदेंनी स्पष्टीकरण दिले. मात्र, शिवसेनेच्या प्रश्नावर अजित पवारांनी उत्तर दिल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.