लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पाचच दिवसांचे अधिवेशन आहे अन् त्यातही आमदारांना कामकाजाची कागदपत्रे वेळेत मिळत नाहीत, विधान भवनाचा एवढा स्टाफ आहे, तो काय करतो, झोपा काढतो का? या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली.
कोरोनामुळे अंतर राखून बसण्याची व्यवस्था केली असल्याने काही आमदारांना प्रेक्षक दीर्घेत बसावे लागते. प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार प्रेक्षक दीर्घेत उभे राहिले. माझ्याच मतदारसंघाबद्दल पहिला प्रश्न आहे आणि प्रश्नोत्तराचे कागद मलाच मिळालेले नाहीत. वरच्या दीर्घेत येऊन कोणी कर्मचारी पाहतही नाहीत, असे म्हणत त्यांनी कागदपत्रे मिळत नाहीत तोपर्यंत कामकाज स्थगित करण्याची मागणी केली. उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी तत्काळ कागदपत्रे आमदारांना द्या, असे निर्देश दिले, तर बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार हे जोरगेवार यांच्या मदतीला धावले. सदस्यांना कामकाजाची कागदपत्रे मिळत नाहीत, हा विषय गंभीर असल्याचे ते म्हणाले.
तेवढ्यात अजित पवार उभे राहिले. प्रत्येक दारामध्ये तुम्ही लोक उभे करता, त्यावेळी आत आमदार आल्यानंतर त्यांच्या हातात गठ्ठा द्या, काम होऊन जाईल, असे म्हणत अजित पवारांनी कर्मचाऱ्यांना सुनावले. सदस्यांच्या वेदना बरोबर आहेत, त्याचे काय चुकीचे आहे? असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला, तसेच पुढील कामकाजाबाबतही त्यांनी काही बदल सुचवले, त्याला नरहरी झिरवाळ यांनीही संमती दर्शवली आहे.
जरा जवळजवळ बसू द्या
आमदार एकमेकांपासून सध्या लांब लांबच बसतात. मात्र, अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस तरी आमदारांना जवळजवळ बसू द्या, अशी सूचना अजित पवार यांनी केली. कुणाची हरकत नसेल तर तसे करू, असे झिरवाळ म्हणाले.