मुंबई - अजित पवार यांच्यासह ९ ज्येष्ठ नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडून सत्ताधारी पक्षात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांच्या या भूमिकेमुळे पक्षात फूट पडल्याचे चित्र समोर आले. सध्या खरी राष्ट्रवादी कुणाची हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. पण संघटना वाढीला भर देण्यासाठी सातत्याने अजित पवार गटाकडून नव्या नेमणुका केल्या जात आहेत.समीर भुजबळ यांच्याकडे मुंबईची जबाबदारी दिल्यानंतर एक तर्हेचे चैतन्य मुंबईत पहायला मिळत आहे. आपल्या पक्षाचे अस्तित्व अनेक पक्षांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे अशा शब्दात अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी कौतुक केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मजबुतीने मुंबईत आपली पक्ष संघटना वाढवणार असून आपल्याला सर्वांना एकत्र राहून तळागाळातील लोकांच्या समस्या सोडवायच्या आहेत. मुंबईतील नागरिकांच्या समस्या आपण सरकार दरबारी मांडण्यासाठी निश्चित प्रयत्न करू असं मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांनी म्हटलं. आज मुंबई विभागीय पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर मध्य मुंबई जिल्हाध्यक्षपदी अर्शद अमीर, उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्षपदी अजय विचारे, पश्चिम मध्य मुंबई जिल्हाध्यक्षपदी सिध्दार्थ कांबळे आणि ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्षपदी सुरेश भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली तर मुंबई युवक अध्यक्षपदी सिध्दीविनायक मंदिराचे विश्वस्त सुनील गिरी यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आणि महिला कार्याध्यक्षपदी आरती साळवी (दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई) आणि मनिषा तुपे (ईशान्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मुंबई) या दोन महिला पदाधिकार्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.यावेळी दोन्ही महिला कार्याध्यक्षांना जिल्हयांची जबाबदारीही देण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे चार जिल्हाध्यक्ष, युवक अध्यक्ष आणि दोन महिला कार्याध्यक्ष पदाची नियुक्ती मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात जाहीर केली. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी आदी उपस्थित होते.