मुंबई: अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, यानंतर शिवसेना शिंदे गटात नाराजी असल्याचा पाहायला मिळत आहे. मंत्रिमंडळ विस्तार रखडला असून, फडणवीस-शिंदे-पवार यांच्यात मतभेद असल्याचे समोर येत आहे.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरूनही दावे-प्रतिदावे केले जात आहे. यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी केलेल्या एका विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात वाद होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्यासह मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये अदिती तटकरे यांचेही नाव आहे. अदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यासाठी शिंदे गटातील भरत गोगावले यांचा जोरदार विरोध आहे. यावर बोलताना, मी आदिती तटकरेंपेक्षा चांगले काम करू शकतो. महिला व पुरुष यांच्यात थोडा तरी फरक येतोच ना. त्यांच्यापेक्षा मला आमदारकीचा १५ वर्षांचा अनुभव आहे, असं वादग्रस्त विधान भरत गोगावले यांनी केलं.
भरत गोगावलेंच्या या विधानावरुन अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी निषेध नोंदवला आहे. आज एका ठिकाणी बोलताना शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी आम्ही त्यांच्यापेक्षा म्हणजे आदिती तटकरे यांच्यापेक्षा चांगलं काम करू. महिला आणि पुरुष थोडा फरक येतो ना?? असं वक्तव्य केल्याचं निदर्शनास आले. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहिलं पण महाराष्ट्रातील कोणतीही महिला मग ती मंत्रीपदावर विराजमान असलेली असो किंवा ती सामान्य गृहिणी असो ती आज कोणत्याही पुरुषापेक्षा कमी नाही. आपल्या या वक्तव्यामधून आपल्या पुरुषी मानसिकतेचे दर्शन सबंध महाराष्ट्राला होत आहे, अशी टीका रुपाली चाकणकर यांनी केली.
रुपाली चाकणकर पुढे म्हणाल्या की, भरत गोगावले ,आपण त्या जिल्ह्यातून येता जिथे संपूर्ण महाराष्ट्र नतमस्तक होतो जिथे विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राजधानीची स्थापना केली. ज्या रायगडच्या आपल्या राजाने महिलांच्या सन्मानाला जीवापाड जपलं आपण त्या रायगडमधून येता जिथे छत्रपती संभाजी महाराजांनी आपली पत्नी येसूबाई यांना 'सखी राज्ञी जयती' असा सन्मान करून अनुपस्थित राज्यकारभार करण्याचा हक्क दिला. त्यामुळे महिलांच्या सन्मानाची जाणीव सर्वात जास्त तर आपल्याला असायला हवी.आपण केलेल्या वक्तव्याचा मी तीव्र निषेध व्यक्त करत असल्याचं रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
भरतशेठ, तुम्ही नादच केलाय थेट
भरतशेठ तुम्ही नादच केलाय थेट! पालकमंत्री पदासाठी आपले हपापणे आपल्या स्वभावाला साजेसे आहेच मात्र स्त्री आणि पुरुषांमध्ये फरक आहे हे तुमचे उद्गार स्त्रीशक्तीला कमीपणा दाखवणारे आहेत. रायगडच्या मातीचे महत्व तुम्हाला यानिमित्ताने काही दिवसातच कळेल. तथास्तु, असे खोचक ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे. तसेच भरत गोगावले यांना टॅगही केले आहे. पालकमंत्रीपदाचा वाद वाढतो की यामुळे शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादीतील तणाव वाढतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.