Join us  

शरद पवारांनी सांगूनही साहेबांचा फोटो का वापरला? सुनील तटकरेंनी सांगितलं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2023 12:09 PM

सुनील तटकरे हे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत

Sharad Pawar Ajit Pawar Sunil Tatkare: राष्ट्रवादीमध्ये सध्या शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट झाल्याचे चित्र आहे. ५४ पैकी कोणता आमदार कोणत्या गटात हे चित्र हळूहळू स्पष्ट होत असले तरी काही गोष्टींबाबत संभ्रमावस्था कायम आहेत. कालच, शरद पवार यांनी त्यांचा फोटो वापरण्यावरून अजित पवार गटाला ठणकावलं होते. अजित पवार गटाने माझ्या विचारधारांशी फारकत घेतली असल्याने माझा फोटो वापरू नये, असे त्यांनी रोखठोकपणे सांगितले. तरीदेखील आज अजित पवार गटाने शरद पवारांचा मोठा फोटो आपल्या बैठकीच्या ठिकाणी वापरला. त्यावरून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले.

"बहुतांश आमदारांचा अजित पवारांनाच पाठिंबा आहे. लोकं अजितदादांच्या पाठीशी भक्कमपणे असल्याचे पाहायला मिळत आहे ही खूपच अभूतपूर्व अशी गोष्ट आहे. किती आमदार, निवडणूक आयोगाकडे जाणार का सगळंच मी तुम्हाला सांगणार नाही, वेळ आली त्याबद्दल बोलेन. पण शरद पवार यांचा मोठा फोटो या ठिकाणी लावला आहे त्यामागे कारण आहे. शरद पवार हे आमचे गुरू आहेत, आमचे दैवत आहेत. त्यामुळे त्यांचा फोटो येथे लावला आहे," असे स्पष्ट शब्दांत तटकरे म्हणाले.

"अजित पवारांच्या पाठीशी सध्या अभूतपूर्व गर्दी आहे. आम्ही महाराष्ट्रभर फिरणार आहोत. पण शरद पवार हे खूप मोठे आहेत. आम्ही सामान्य कार्यकर्ते आहोत. साहेबांशी संघर्ष किंवा आव्हान ही बाब आम्ही स्वप्नातही पाहिले नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले. 

 

टॅग्स :महाराष्ट्रातील सत्तासंघर्षसुनील तटकरेअजित पवारशरद पवार