Join us  

अजित पवार गट करणार २८८ मतदारसंघांचा सर्व्हे; ६० पेक्षा जास्त जागांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 11:05 AM

आमच्या पक्षाचे ५४ आमदार मागील विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते, त्यातील पंढरपूरची जागा आम्ही पोटनिवडणुकीत गमावली, म्हणजेच आमच्या पक्षाचे ५३ आमदार आहेत.

मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक महायुतीत लढणार असल्याचे स्पष्ट करतानाच अजित पवार गट राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांचा सर्व्हे करणार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना सांगितले.

आमच्या पक्षाचे ५४ आमदार मागील विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते, त्यातील पंढरपूरची जागा आम्ही पोटनिवडणुकीत गमावली, म्हणजेच आमच्या पक्षाचे ५३ आमदार आहेत. त्याव्यतिरिक्त आम्हाला पाठिंबा दिलेल्या आमदारांची संख्या लक्षात आम्हाला विधानसभेला ६० पेक्षा जास्त जागा मिळायला हव्यात, अशी भूमिकाही पटेल यांनी मांडली. एखाद्या मतदारसंघांत आमच्याकडे एखादा सक्षम उमेदवार असेल तर त्याच्यावर अन्याय नको म्हणून हा सर्व्हे करणार असल्याचे पटेल म्हणाले.

महायुतीतील तीनही पक्ष आपापले सर्व्हे करतील. प्रत्येकाचा सर्व्हे घेऊन आम्ही जागावाटपाच्या चर्चेला बसू, आणि त्यामध्ये एकमत होईल त्याप्रमाणे जागावाटप होईल असे उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी सांगितले.

‘तो’ निर्णय भाजप घेईल : अजित पवार

सध्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे त्यांचीच गॅरंटी चालेल असे सांगताना आगामी विधानसभा निवडणूक कोणाच्या नेतृत्वाखाली लढवायची याचा निर्णय महायुतीत मोठा पक्ष असलेला भाजप घेईल, असे अजित पवार म्हणाले.

माढा आणि नगर लोकसभेची जागा आम्हाला मिळाली असती तर आज तिथे महायुतीचे खासदार असते असेही ते म्हणाले.

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस