मुंबई- २ जुलै रोजी राष्ट्रवादीतील नऊ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे दिसत आहे. आता खासदार शरद पवार यांचा एक गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक गट असे दोन गट पडले. काही आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला तर काही आमदारांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला, आपल्या बाजूने आमदार वळण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न सुरू आहे, दरम्यान, काही आमदार बाहेरच्या देशात होते. आज आमदार आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पाठिंबा दिला.
खातेवाटपाचा वाद अमित शाहांच्या कोर्टात! निर्णय दिल्ली दरबारी होणार? अजित पवार रवाना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आता आणखी एका आमदाराची ताकद मिळाली आहे. आमदार आशुतोष काळे यांनी अजित पवार यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. आमदार काळे गेल्या आठवड्यात विदेशात दौऱ्यावर होते. त्यामुळे त्यांचा पाठिंबा कोणत्या गटाला असणार अशा चर्चा रंगल्या होत्या. आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
अजित पवार यांनी बोलवलेल्या बैठकीत २६ हून अधिक आमदारांनी हजेरी लावली होती. यामुळे पवार यांना जास्त पाठिंबा असल्याचे बोलले जात होते, तर शरद पवार यांनी बोलवलेल्या बैठकीतही वीसहून अधिक आमदारांनी पाठिंबा दिला होता.
खातेवाटपाचा वाद अमित शाहांच्या कोर्टात!
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकारणाला पुन्हा कलाटणी मिळाली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असे सांगितले जात होते. मात्र, खातेवाटपावरून एकमत होत नसल्याने हा तिढा सुटताना दिसत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यास शिंदे गटासह मित्र पक्षांचा विरोध असल्याचे पाहायला मिळत आहे. तर काही खात्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याचे दिसत आहे. आता खातेवाटपाचा वाद केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्या कोर्टात गेल्याचे सांगितले जात आहे. यासाठी अजित पवार दिल्लीला रवाना झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
सलग दोन रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठका झाल्या. मात्र, राष्ट्रवादीच्या मंत्रिपदाचा तिढा काही सुटायचे नाव घेत नाही. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ मंत्र्यांच्या शपथविधीला ९-१० दिवस उलटले असले तरी खातेवाटप काही केल्या होत नाही. यामुळे शिवसेनेसोबतच राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये देखील चिंतेचे वातावरण आहे. महाराष्ट्रात बैठकांवर बैठका घेऊनही तिढा सुटत नसल्याने अखेर अजित पवारांनी दिल्ली गाठण्याचे ठरविले आहे. यासाठी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे दिल्लीला निघाले आहेत.