मुंबई - एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्रिपद आणि शिवसेनेवर सत्ता गमावण्याची नामुष्की ओढवली होती. मात्र या बंडखोरांविरोधात शिवसेनेने न्यायालयीन लढाई सुरू केली आहे. त्यातच शिवसेनेचे प्रवक्ते बंडखोरांवर रोज टीकेचे आसूड ओढत आहेत. आता राऊत यांनी शिंदे सरकार लवकरच पडेल, असा दावाही केला आहे. दरम्यान, राज्यात सत्तांतर होईल असा दावा करणाऱ्या संजय राऊत यांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुनावले आहे. तसेच सरकार पडणार का याबाबत दावे करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या समस्या पाहा, असा सल्ला अजित पवार यांनी दिला आहे.
संजय राऊत राज्यात सत्तापरिवर्तन होईल असा दावा करताना म्हणाले होते की, संविधानाच्या आणि कायद्याच्या विरोधात कुठलेही न्यायमूर्ती निकाल देणार नाहीत, याची आम्हाला खात्री आहे. १६ बंडखोर आमदार अपात्र ठरतील. किंवा त्यांना स्वत:चा बचाव करण्यासाठी एखाद्या पक्षात विलीन व्हावं लागेल. मग ते स्वत:ला शिवसैनिक कसे म्हणवतील. अशा परिस्थितीत बंडखोरांपैकी किती आमदार हे दुसऱ्या पक्षात विलीन व्हायला तयार आहेत. त्याची संपूर्ण कल्पना आम्हाला आहे. काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे भविष्यात पुन्हा एकदा मराहाष्ट्रात सत्तापरिवर्तन झालं, तर आश्चर्य वाटायला नको, असा दावा संजय राऊत यांनी केला होता.
त्याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, आमच्या संपर्कात कुणी आमदार नाही. त्यामुळे मी कशाला उगाच काहीतरी सांगू. आमच्या संपर्कात कुणी आमदार आल्यानंतर मी त्याबद्दल काही सांगेन. आज माझं स्वत:चं मत आहे की, आजच्या घडीला एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा सध्या राज्यात पूरपरिस्थिती गंभीर आहे तिथे मदत करण्यासाठी पुढे आलं पाहिजे. तसेच महाराष्ट्रातील जनतेला मदत करण्यासाठी पुढाकार घेऊन पुढे यावं.