मुंबई - ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी नगरसेवकांची आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत वेळेप्रसंगी जितेंद्र आव्हाड यांच्याशिवाय निवडणुका जिंकाव्या लागू शकतात. त्यामुळे तयारी करा असा सल्ला देण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
या बैठकीनंतर ठाण्याचे राष्ट्रवादी शहराध्यक्ष आनंद परांजपे म्हणाले की, अजित पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ठाण्यातील सर्व नगरसेवकांची बैठक बोलावली होती. आम्ही राष्ट्रवादीशी एकनिष्ठ आहोत. शरद पवारांच्या विचारांवर निष्ठा आहे असं नगरसेवकांनी सांगितले. परंतु गेल्या २-३ महिन्यापासून घटनाबाह्य सरकारनं प्रशासन, पोलिसांचा गैरवापर केला जातोय. कधी प्रलोभन दाखवून तर कधी दडपशाहीने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना टार्गेट करण्याचं काम होतंय असा आरोप त्यांनी केला.
तसेच नगरसेवकांनीही भीती व्यक्त केलीय ऐन निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम करू शकते. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सर्व शंका अजितदादांसमोर मांडल्या. महापालिकेची मुदत संपली असून गेल्या बजेटमध्ये जो निधी दिला होता तोदेखील कापण्यात आला. घटनाबाह्य सरकारसोबत असल्यास निधी दिला जातोय. पण आम्ही या लढ्याला तयार आहोत असं आनंद परांजपे म्हणाले.
दरम्यान, ऐन निवडणुकीच्या प्रचाराला आमचा सेनापतीच नसेल अशी व्यूहरचना घटनाबाह्य सरकार करू शकते. खोटी केस दाखल करून आव्हाडांना अडकवण्याची भीती कळवा-मुंब्राच्या नगरसेवकांनी व्यक्त केली असंही परांजपेंनी सांगितले.
बैठकीत काय घडलं?महापालिका निवडणुकीपूर्वी जितेंद्र आव्हाडांना अटक होण्याची शक्यता आहे. जितेंद्र आव्हाडांना अटक झाली तरी जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा. वेळप्रसंगी जितेंद्र आव्हाडांशिवाय निवडणूक पार पाडावी लागेल. सध्या आव्हाडांसोबतच आनंद परांजपे यांच्यावरही कारवाई करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपल्याला कुठल्याही परिस्थिती माघार घ्यायची नाही असं बैठकीत ठरलं आहे.