Join us

अजित पवारांनी घेतली सांगलीतील NCP पदाधिकाऱ्यांची बैठक! जयंत पाटलांच्या समर्थकांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 11:21 AM

काल आमदार जयंत पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई- शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीत खासदार शरद पवार गट आणि अजित पवार यांचा एक गट असे दोन गट पडल्याचे दिसत आहेत. शरद पवार यांच्या गटात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह जितेंद्र आव्हाड आहेत. काल आमदार जयंत पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे, यात जयंत पाटील यांच्या समर्थकांचाहीव समावेश होता असंही बोलले जात आहे. 

आमदार अपात्रतेचा निर्णय कधी लागणार? शिंदे गटाने पाठविले ६००० पानांचे उत्तर

काल मुंबईत सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठर अजित पवार यांनी घेतली. या बैठकीत जयंत पाटील यांच्या समर्थकांचाही समावेश होता. अजित पवार यांच्याकडे सांगली, सातारा, पुण्याची जबाबदारी आहे. ही जबाबदारी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच पवार यांनी सांगलीतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. 

या बैठकीत सांगलीतील जयंत पाटील यांच्या समर्थकांनाही उपस्थिती लावली होती, यामुळे पाटील यांना हा मोठा धक्का मानला जातो. या बैठकीमध्ये सांगलीतील वैभव पाटील यांच्यासह, पद्माकर जगदाळे उपस्थित होते. वैभव पाटील हे विट्याचे माजी नगराध्यक्ष आहेत. 

दरम्यान, आज राष्ट्रवादीतील शरद पवार यांच्या गटाची कोल्हापूर येथे स्वाभीमान सभा होणार आहे. पहिली सभा काही दिवसापूर्वी बीड येथे झाली होती. आता दुसरी सभा कोल्हापूर येथे होत आहे. बीड येथे झालेल्या सभेला उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचे बोलले जात आहे.  

शरद पवारांचा कोल्हापूर दौरा 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शुक्रवारी (दि. २५) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पवार पहिल्यांदाच कोल्हापुरात येत असून, त्यांची दसरा चौकात जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या सभेबाबत जिल्ह्यात कमालीची उत्सुकता आहे. ते दोन दिवस कोल्हापुरात तळ ठोकून राहणार असून, दिग्गजांच्या गाठीभेटी व राजकीय खलबतेही होणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पक्षाध्यक्ष पवार यांची कोल्हापुरात सभा व्हावी, यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले होते. त्यानुसार ही सभा होत असून, त्यासाठी ते कोल्हापुरात येत आहेत. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता ते दहीवडी (जि. सातारा) येथून ते मोटारीतून कोल्हापुरात येणार आहेत. सायंकाळी ६ वाजता ते दसरा चौकातील सभेच्या ठिकाणी जाणार आहेत. या दिवशी त्यांचा कोल्हापुरात मुक्काम असून, शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता ते शिष्टमंडळाला भेटणार आहेत.

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसजयंत पाटीलशरद पवार