Join us  

Ajit Pawar: शरद पवारांशी माझं बोलणं झालं, अजित पवारांनी मोदी भेटीचं कारण सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 1:32 PM

शरद पवारांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास २५ मिनिटं चर्चा झाली आहे. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली, त्याबद्दल स्वत: शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. मात्र, या भेटीची सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या भेटीत नेमका संवाद झाला, त्याबद्दल प्रत्येकजण तर्कवितर्क लढवत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही या भेटीबद्दल स्पष्ट मत व्यक्त केलंय.

शरद पवारांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे, आता मला याबाबत काहीही विधान करायचं नाही. कारण, मोठ्या नेत्यांनी बोलल्यानंतर आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं उचित नाही. राज्यातील आणि देशातील काही महत्त्वाचे विषय आहेत, त्यासंदर्भातच शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीत चर्चा झाली आहे. माझं शरद पवार यांच्याशी दिल्ली भेटीबाबत बोलणं झालंय, असेही अजित पवार यांनी सांगितले. 

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा विषय

काही दिवसांपूर्वी आम्ही शरद पवारांसोबतच्या बैठकीत राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा विषय उपस्थित केला. मंत्रिमंडळानं दिलेल्या यादीवर वर्ष उलटूनही राज्यपाल कार्यवाही करत नाही. आम्ही अनेकदा विनंती करुनही उपयोग झालेला नाही. याबद्दल वरिष्ठ पातळीवर बोला असं आम्हाला सांगितलं जातं. तुम्ही आमचे नेते आहात. म्हणून आम्ही हा विषय तुम्हाला सांगत आहोत. तुम्ही कृपया वरिष्ठ पातळीवर बोला, असं आम्ही शरद पवारांना सांगितलं होतं. त्यामुळे त्यासंदर्भात ही भेट असू शकते, असा अंदाज पवारांनी वर्तवला होता. 

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारनरेंद्र मोदी