Join us

Ajit Pawar: अजित पवारांसोबत किती आमदारांचं बळ?; वेगवेगळ्या आकड्यांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 10:46 AM

Ajit Pawar: अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याची चर्चा रंगली असताना यादरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार, या चर्चेने सोमवारी पुन्हा जोर धरला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सासवड (जि. पुणे) येथे आयोजित शेतकरी मेळाव्याला ते जाणार होते. मात्र, हा कार्यक्रम रद्द करून ते मुंबईतच थांबले. दुपारनंतर अजित पवारांनी आपल्या समर्थक आमदारांची बैठक बोलावल्याच्या चर्चेने जोर धरला. दिवसभर याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाही त्यांनी चुप्पी साधल्याने चर्चेला बळच मिळाले. 

अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याची चर्चा रंगली असताना यादरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अजित पवारांबरोबर सध्या १५च्या आसपास आमदार जायला तयार आहेत, यात पक्षातील काही बड्या नेत्यांचाही समावेश आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ आमदारांपैकी ४० आमदारांच्या सह्या घेतल्या असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच या आमदारांच्या सह्याचं पत्र घेऊन अजित पवार राज्याचे राज्यपाल यांना भेटण्याची चर्चा देखील रंगली आहे. अजित पवार विधानभवन परिसरात रवाना झाले असून तिथे ते काही आमदारांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलं आहे.

अजित पवारांमध्ये मुख्यमंत्रिपदाचे गुण; महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरुय, पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आगामी १५ दिवसांत दोन मोठी राजकीय घडामोड घडणार आहे. यामधील एक दिल्लीत आणि एक महाराष्ट्रात होणार असल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे. सुप्रिया सुळेंच्या या दाव्यानं राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. सुप्रिया सुळे यांना आजित पवार कुठे आहे असे विचारण्यात आले. यावर 'तुम्ही सर्व चॅनलवाल्यांनी अजितदादांच्या मागे एक युनिट लावावे. राज्यात अनेक समस्या आहेत, राज्यात चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

अजित पवार भाजपासोबत जाणार का?, असा सवालही सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. यावर 'हे दादांनाच विचारा...मला गॉसिपसाठी वेळ नाही, लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे खूप काम आहे, त्यामुळे मला त्याची माहिती नाही. पण कष्ट आणि मेहनत करणारा नेता असल्याने अजितदादा सर्वांनाच आवडतात. त्यामुळे अशी विधाने केली जातात, असं स्पष्टीकरण सुप्रिया सुळेंनी दिलं. 

अजित पवार काय म्हणाले? 

खारघर येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार सोहळ्याच्यावेळी उष्माघाताने मृत्युमुखी पडलेल्या तसेच उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबीयांची भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो. सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता, मी मुंबईतच आहे, असा खुलासा अजित पवार यांनी ट्विट करत केला आहे. तसेच मंगळवारी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरू राहणार आहे. 

कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम कायम

अजित पवारांनी हा खुलासा केला असला तरी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण कायम आहे. २०१९ रोजी अजित पवारांनी पहाटे राजभवनभर जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती, तेव्हाही असे काही घडेल असे राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना वाटले नव्हते. तसेच यापूर्वी त्यांनी अचानक अनेक राजकीय धक्के दिलेले आहेत. त्यामुळे यावेळीही त्यांच्या भाजपबरोबर जाण्याच्या सुरू असलेल्या चर्चेत तथ्य असावे, असा संशय राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. यासंदर्भात पक्षातील एका पदाधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, अजित पवार पुढे येऊन जोपर्यंत खुलासा करत नाहीत, तोपर्यंत हा संभ्रम कायम राहणार आहे.

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसभाजपामहाराष्ट्र सरकारएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस