देशात काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. सर्व पक्षांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे, देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी सुरू केली असून जागावाटपाची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर असल्यामुळे महायुती एकत्रच निवडणुका लढणार आहे. या महायुतीमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आहेत. लोकसभेच्या निवडणुका हे तिनही पक्ष एक लढणार असून आता जागावाटपाची जोरदार चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १० जागांवर दावा सांगितल्याचे बोलले जात आहे.
लोकसभेच्या जागांबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे, ही बैठक मुंबई होणार असून या बैठकीला अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार आहे. या बैठकीत राज्यातील कोणत्या जागा लढवायच्या याबाबत चर्चा होणार आहे.
काँग्रेस-शिवसेनेत १० जागांवरुन भांडणं, तर...; प्रकाश आंबेडकरांनी सांगितली 'अंदर की बात'
या दहा जागांवर दावा
या बैठकीत १७ मतदार संघांबाबत चर्चा होणार असून लोकसभेच्या दहा जागांवर अजित पवार यांनी दावा केला आहे. रायगड, बारामती, सातारा, शिरुर, धाराशिव, परभणी, बुलढाणा, हिंगोली, गडचिरोली, माढा या दहा मतदार संघासाठी अजित पवार गट आग्रही आहे. महायुतीमध्ये या जागांची पवार यांनी मागणी केली आहे. या बैठकीत भंडारा, दिंडोरी, नाशिक, मुंबई उत्तर पूर्व, ईशान्य मुंबई, कोल्हापूर, अहमदनगर या जागांवरही चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे.
रायगड मतदार संघात सध्या अजित पवार गटाचे सुनिल तटकरे खासदार आहेत, तर बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे या खासदार असून सातारा, शिरुर मतदार संघातही शरद पवार गटाचे खासदार आहेत. तर धाराशिव, परभणीमध्ये शिवसेनेचे खासदार आहेत. या जागांवर आता महायुतीमध्ये चर्चा होणार आहे. दोन दिवसातच या जागांवरील निर्णय होणार असल्याचे बोलले जात आहे.