Join us

अजित पवारांची गॅरंटी नाही, भाजप नेत्यांच्या राष्ट्रवादी प्रेमावर गोऱ्हे स्पष्टच बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2022 4:44 PM

शिवसेनेनं अजित पवारांचा काही भरवसा नाही, अशा आशयाचं विधान केल्यानं पुन्हा एकदा महाविकास आघाडीवरुन चर्चा रंगली आहे. 

मुंबई - राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार टिकणार नाही. ते कोसळेल हा दावा अनेकदा विरोधकांकडून करण्यात येत आहे. परंतु कुणीही डेडलाईन देत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचं २ दिवसीय अधिवेशन शिर्डीत होत आहे. यात जयंत पाटलांनी पुन्हा शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचा दावा केला. दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे. शिंदेंनी राक्षसी महत्वाकांक्षा दाखवल्याचं अजित पवार यांनी म्हटलं होतं. आता, दुसरीकडे शिवसेनेनं अजित पवारांचा काही भरवसा नाही, अशा आशयाचं विधान केल्यानं पुन्हा एकदा महाविकास आघाडीवरुन चर्चा रंगली आहे. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेसंदर्भात विधान केलं होतं. शिवसेना हा काँग्रेसचा नैसर्गिक मित्र नाही, असे म्हणत एकप्रकारे महाविकास आघाडीच्या कायमस्वरुपीच्या अस्तित्वावरच त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. आता दुसरीकडे शिवसेना उपनेत्या आणि आमदार निलम गोऱ्हे यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत भाजपची असलेली जवळीक सांगताना वेगळाच दाखला दिला. अजित पवार यांची काही गॅरंटी नाही, असे स्पष्ट शब्दात गोऱ्हेंनी म्हटल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

पूर्वी गिरीश बापट पालकमंत्री होते तेव्हा मी डोळ्याने पाहिलेलं आहे. ते राष्ट्रवादीच्या आमदारांना प्रेमानं बोलावून निधी द्यायचे, पण आता तसं राहिलं नाही. मध्ये बरंच पाणी वाहून गेलंय. मविआ एकत्र झालीय, त्यातच अजित पवारांची कोणालाच गॅरंटी नाही, असे स्पष्ट शब्दात शिवसेना नेत्या आणि आमदार निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. तसेच, बारामतीत भाजपला सुप्रिया सुळेंना पराभूत करायचंय, पूर्वी संताजी-धनाजी सगळीकडे दिसायचे, तशी आता भाजपला मविआ आणि आमचे सहकारी सगळीकडे दिसतात, मला तर आमदार म्हणून अजिबातच निधी दिला नव्हता, असेही गोऱ्हे यांनी म्हटले. 

निलम गोऱ्हेंचं वक्तव्य दुर्दैवी 

राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल निलम गोऱ्हेंनी असं बोलणं हे दुर्दैवी आहे. अजित पवारांवर जोपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा विश्वास आहे, तोपर्यंत महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच्या बाबतीत कुठलेही मतभेद होण्याचा विषय नाही, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी म्हटलं आहे. 

भाजप युतीचं सरकार कोसळेल- पाटील

जयंत पाटील म्हणाले की, जेव्हा शिर्डीत काँग्रेसचं अधिवेशन झाले तेव्हा महाविकास आघाडी सरकार पडलं. आता राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन होत आहे. याठिकाणी जेव्हा जेव्हा कुठल्या पक्षाचं अधिवेशन झाले तेव्हा त्यावेळचं सरकार कोसळलं आहे असा दावा त्यांनी केला आहे. जयंत पाटलांच्या विधानाला दुजोरा देत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही सरकार कोसळण्याचं भाकीत केले.

टॅग्स :शिवसेनाअजित पवारनीलम गो-हेमहाविकास आघाडी