Ajit Pawar IT Raids: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर आयकर विभागानं (Income Tax Raid) छापे टाकले आहेत. यात अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावरही छापेमारी करण्यात आली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी केवळ रक्ताचं नातं म्हणून बहिणींच्या घरावर छापेमारी केली याचं वाईट वाटलं, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत बोलत होते.
राज्यातील दौड शुगर, अंबालिका शुगर्स, जरंडेश्वर, पुष्पगनतेश्वर, नंदुरबार या कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आले आहेत. या सर्व कारखान्यांचे संचालनक अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. तसंच अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावरही आयकर विभागानं छापेमारी केली आहे.
"माझ्याशी संबंधित कारखान्यांवर आयकर विभागानं छापेमारी केली याचं अजिबात वाईट वाटत नाही. पण माझ्याशी फक्त रक्ताचं नातं आहे म्हणून माझ्या तीन बहिणींच्या घरावर छापेमारी केली याचं वाईट वाटलं", असं अजित पवार म्हणाले.
"माझ्या तीन बहिणींचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही. त्यांचा कोणत्याही कंपन्यांशीही संबंध नाही. त्या लग्न करुन त्यांच्या त्यांच्या घरी सुखात संसार करत आहेत. तरी माझ्याशी नातं असल्यामुळे त्यांच्या घरावर छापेमारी केली याचं वाईट वाटतं. माझ्याशी संबंधित सर्व कंपन्यांचे आयकर वेळच्या वेळी भरले जातात. त्याची मी स्वत: काळजी घेत असतो. कोणताही कर चुकवत नाही", असंही अजित पवार म्हणाले.
'ते' तुम्ही आयकर विभागालाच विचाराआयकर विभागानं टाकलेल्या धाडी राजकीय हेतूनं प्रेरित आहेत का? असं विचारण्यात आलं असता अजित पवार यांनी माझ्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर आणि माझ्या बहिणींच्या घरावर टाकलेले छापे हे राजकीय हेतूनं टाकले की इतर कोणत्या हेतूनं ते आयकर विभागालाच विचारा, असं अजित पवार म्हणाले. याशिवाय आजवर एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण कधी पाहायला मिळालं नव्हतं. महाराष्ट्रात सत्तेचा गैरवापर कधीच पाहायला मिळाला नाही. पण ते काही सुरू आहे ते जनता सगळं बघते आहे, असंही ते म्हणाले.
किरीट सोमय्यांनी जरंडेश्वरला दिली होती भेटयापूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याला भेट दिली होती. तसंच या ठिकाणी लिलाव चुकीच्या पद्धतीनं केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. साखर कारखान्याच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोपही त्यांनी केला होता. तसंच यासंदर्भातील कागदपत्रेही इन्कम टॅक्स आणि ईडीच्या अधिकाऱ्यांना दिल्याचं म्हटलं होतं.